Malvani masala recipe in Marathi: कोकणी खाद्यसंस्कृती विविध पाककृतींनी समृद्ध आहे. यामुळे कोकणी पदार्थ केवळ भारतीयांनाच नाही तर जगभरातील खाद्यप्रेमींना भुरळ घालतात.कोकणी पदार्थांची चव त्यांच्या मसाल्यात लपलेली असते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. मालवणी चिकन, माशाचे कालवण, काळ्या वाटण्याची उसळ, ओल्या काजूची भाजी असे अस्सल कोकणी पदार्थ पाहिले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं..मात्र हे पदार्थ चविष्ट होतात ते त्यामध्ये मिसळलेल्या स्पेशल मालवणी मसाला रेसिपीमुळे… हा मसाला बनवण्याची एक खास पद्धत आणि प्रमाण आहे. साहित्याचे प्रमाण आणि योग्य पद्धत फॉलो केली तर कुणीही घरच्या घरी खमंग मालवणी मसाला तयार करू शकतं.यासाठीच वाचा ही स्पेशल मालवणी मसाला रेसिपी जी तुम्हीदेखील अगदी घरच्या घरी स्वतः बनवू शकता.
मालवणी मसाला साहित्य आणि त्याचे प्रमाण –
- बेडगी सुकी लाल मिरची १ किलो
- संकेश्वरी सुकी लाल मिरची १ किलो
- काश्मिरी लाल मिरची १ किलो
- पांडी लाल मिरची १ किलो
- धणे अर्धा किलो (धण्याचे प्रमाण तुम्हाला मसाला किती तिखट हवा यानुसार ठरवावे)
- काळीमिरी ५० ग्रॅम
- बडीशेप ५० ग्रॅम
- खसखस ५० ग्रॅम
- लवंग ५० ग्रॅम
- तमाल पत्र २० ग्रॅम
- जायफळ दोन नग
- चक्रीफुल १० ग्रॅम
- नागकेशर १० ग्रॅम
- दगडफूल १० ग्रॅम
- दालचिनी १० ग्रॅम
- शाही जिरे १० ग्रॅम
- मसाला वेलची १० ग्रॅम
- त्रिफळ १० ग्रॅम
- हळकुंड १०० ग्रॅम
- खडे हिंग १० ग्रॅम
मालवणी मसाला बनवण्याची योग्य पद्धत –
स्पेशल मालवणी मसाला टिकण्यासाठी त्याचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत योग्य पद्धतीने फॉलो करणं गरजेचं आहे. हा मसाला तुम्ही कमी प्रमाणात घरी मिक्सरवर दळून बनवू शकता. मात्र तुम्हाला तो किलोच्या प्रमाणात वर्षभरासाठी तयार करायचा असेल तर तो दळून देण्यासाठी खास डंक असतात तिथे तो दळून घ्यावा. मात्र त्याआधी या काही स्टेप्स तुम्हाला घरी करणं गरजेचं आहे.
- स्टेप १ – सर्व प्रकारच्या मिरच्या दोन ते तीन दिवस कडक उन्हात वाळवाव्या असं न केल्यास तिखटामध्ये किडे पडू शकतात. यासाठीच ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे.
- स्टेप २ – मिरचीसोबत साहित्यात असलेलं गरम मसाल्याचं इतर साहित्यही उन्हात वाळवून घ्यावे.
- स्टेप ३ – वाळवलेल्या मिरच्यांचे देठ खुडून घ्यावे आणि एका जाड बुडाच्या भांड्यात कडक होईपर्यंत भाजून घ्याव्या (हे करत असताना मिरच्यांच्या वासाने ठसका लागण्याची आणि हातांना जळजळ होण्याची शक्यता असते. यासाठी मिरच्या हाताळताना हाताला तेल लावावे आणि भाजताना तोंडावर मास्क लावावा)
- स्टेप ४ – सर्व खडे मसाले देखील कढईत भाजून घ्यावे, मसाला कमी तिखट हवा असेल तर त्यामध्ये धण्याचे प्रमाण वाढवावे.
- स्टेप ५ – मिश्रण थंड झाल्यावर कमी प्रमाणात असेल तर घरीच मिक्सरवर दळावे. मात्र वर्षभरासाठी किलोच्या प्रमाणात करायचे असेल तर मिरची कुटण्याच्या डंकावर दळून आणावे
- स्टेप ६ – मसाल्यामध्ये खड्या हिंगाचे तुकडे टाकावे ज्यामुळे मसाला जास्त दिवस टिकतो.
हेही वाचा >> विस्मरणात गेलेला चुरचुरीत न्याहरीचा पदार्थ “कायलोळी”, खुसखुशीत नाश्ता एकदा नक्की ट्राय करा
- स्टेप ७ – घरी दळलेला अथवा डंकावरून दळून आणलेला मसाला थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा.
- स्टेप ८ – मसाला वापरताना तो थोडा थोडा काढून घ्यावा ज्यामुळे लवकर खराब होणार नाही.