Malvani Sweet Recipe: श्रावणात वेगवेगळे सणसमारंभ असल्याने विविध स्वादिष्ट पदार्थांची चंगळ पाहायला मिळते. विशेषत: कोकणात प्रत्येक सणानिमित्त गोड पदार्थ बनवण्याची एक परंपरा पाहायला मिळते. पावसाळ्यात कोकणात अनेकांच्या दारापुढे काकडी आणि इतर भाज्यांच्या वेली पाहायला मिळतात. त्यामुळे काही पदार्थ हे याच काकडी, भोपळा वापर करुन बनवले जातात. कोकणात श्रावणात काकडीपासून बनवला जाणारा आवडीचा पदार्थ म्हणजे तवसाच्या वड्या. किसलेली काकडी, तांदळाचे पीठ गूळ घालून बनवलेल्या या तवसाच्या वड्या एकदा खाल्ल्या तर त्याची चव तुम्ही आयुष्यभर विसरु शकत नाहीत. त्यामुळे आज आपण स्वादिष्ट अस्सल मालवणी तवसाड्या वड्या बनवण्याची रेसिपी जाणून घेऊ…
साहित्य
४ कप तवसाचा खीस ( काकडीचा खीस ), ५ टेबल स्पून साजूक तूप, २५० ग्रॅम बारीक रवा (३ कप), २०० ग्रॅम गूळ, ½ कप दूध, ½ कप ओल्या नारळाचा खीस, ½ टी स्पून वेलदोड्याची पूड, चिमूटभर जायफळ पावडर, सोयीनुसार काजूचे काप, किशमिश आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप.
कृती –
प्रथम एका पॅनमध्ये ४ टेबल स्पून साजूक तूप घालून चांगले गरम करावे. यानंतर तूप गरम झाल्यावर त्यात रवा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. परतून झालेला रवा एका बाऊलमध्ये काढून घ्या. आता त्याच पॅनमध्ये काकडीचा खीस आणि गूळ घालून गूळ वितळेपर्यंत परतून घ्या.
गूळ वितळल्यावर त्यात भाजलेला रवा घालावा आणि सोबत दूध आणि १ टेबल स्पून साजूक तूप घालावे. आता संपूर्ण मिश्रण चांगले एकजीव आणि घट्ट होईपर्यंत परतून घ्यावे. मिश्रण हलके घट्ट झाल्यावर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर, काजूचे काप आणि किशमिश घालून पुन्हा एकजीव करावे आणि २ मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी.
२ मिनिटांनी गॅस बंद करावा. एका खोलगट स्टीलच्या स्पेटला तुपाचा हात फिरून घ्या म्हणजे वड्या खाली चिकटणार नाहीत. आता या प्लेटमध्ये तयार तवसाचे मिश्रण घालून नीट पसरवून घ्या. वरून पिस्त्याचे काप लावून ३० मिनिटे हे थंड करून घ्या. तवसाचे मिश्रण थंड झाल्यावर वड्या पाडून घ्याव्यात. अशाप्रकारे तयार झाल्या स्वादिष्ट तवसाच्या वड्या…