हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही रोज उत्तम जेवण जेवत असाल तर तुमचे आरोग्यही उत्तम राहते. अशात हिवाळ्यात गरमा गरम सूप पिणे तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरु शकते. थंड वातावरणात गरम सूप प्यायल्याने एक एनर्जी मिळते, तसेच फ्रेश वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यासाठी स्पेशल चिकन मशरूम सूप कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ रेसिपी…
साहित्य
१) ४ ते ५ मशरूम पिस
२) आवश्यकतेनुसार काळी मिरी
३) पातीचे कांदे
४) ४ ते ५ पाकळ्या लसूण
५) चिकनचा मोठा तुकडा(लेग पिस)
६) ४ टेबलस्पून बटर
७) ६ अंड्यातील पिवळ बलक
८) कोथिंबीर
९) चवीपुरते मीठ
हेही वाचा – अस्सल मालवणी पद्धतीने बनवा खमंग ‘कुळथाचे पिठले’; जाणून घ्या पारंपरिक रेसिपी…
कृती
सुरुवातीला कोमट पाण्याने चिकन व्यवस्थित धुवा घ्या, यानंतर त्याचे बारीक तुकडे करुन एका पातेल्यात पाणी घेऊन शिजवत ठेवा. शिजल्यानंतर ते पाणी गाळून घ्या. शिजलेल्या चिकनचे आणखी बारीक तुकडे करा. मशरूम धुवा आणि त्याचे तुकडे करा.
यानंतर गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात थोडे बटर घाला. बटर वितळायला लागले की मशरूम घालून परतून घ्या. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, कापलेला पातीचा कांदा टाकून परता आणि त्याववर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्या.
आता उकळलेल्या चिकनचे बारीक तुकडे आणि त्याचे गाळून घेतलेले पाणी घालून एक उकळी आणा. नंतर अंड्यातील पिवळ बलक घाला आणि सर्व घटक चांगले मिसळा आणि झाकण लावा.
चिकन शिजलेले दिसले की त्यात तुमच्या चवीनुसार दूध, मिरी आणि मीठ, थोडी कोथिंबीर घालून सतत ढवळत रहा. सूपला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्या.