Masala corn pocket recipe in marathi: दररोज नाश्त्यासाठी अनेकदा काय बनवावं ते कळत नाही. अनेकदा तेच तेच खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. आणि रोज नवीन काय बनवायचं हाच प्रश्न पडतो. म्हणून तुम्ही घरच्या घरी एक रेसिपी ट्राय करू शकता, जी झटपटही होते आणि चवदार आहे. चला तर मग, जाणून घेऊ या मसाला कॉर्न पॉकेट ’ घरच्या घरी कसे बनवायचे…

साहित्य

  • 1 मक्याच्या कणसाचे दाणे
  • 1 कांदा बारीक चिरुन
  • 1 टीस्पून आलेलसूण पेस्ट
  • 1 टीस्पून तिखट किंवा आवडीप्रमाणे
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून धणेपूड
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • चवीनुसार मीठ
  • थोडी कोथिंबीर बारीक चिरुन
  • 1 लिंबाचा रस
  • 2 मेझरींग कप मैदा कव्हर साठी
  • 1 टीस्पून ओवा
  • चवीनुसार मीठ
  • 1/4 कप तेल मोहन
  • 1 टीस्पून जीरे फोडणीकरीता
  • 1 टीस्पून मोहरी
  • तळणासाठी तेल
  • आवश्यकतेनुसार पाणी

कृती

प्रथम आपण कव्हर म्हणजे पॉकेट करण्यासाठी मैदा भिजवून घेऊ. मैदा चाळून घेऊन त्यात मीठ, ओवा हातावर चोळून टाका, मिक्स करुन घ्यावे, नंतर तेल टाकून मैद्याला चांगले चोळून घ्यावे. 2-3 मिनीट. नंतर थोडे थोडे पाणी टाकून कडक भिजवून घ्यावे.व 20 मिनीट झाकून ठेवावे.

आता सारण करुया. मक्याचे दाणे किंचित वाफवून घ्यावे.व जाडसर बारीक करावे. शक्यतोवर मिक्सर वापरु नये. कारण त्याची पेस्ट होते.

त्यानंतर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून जिरेमोहरी टाकून तडतडल्यावर कांदा, आलेलसूण पेस्ट टाकून परतावे. एक मिनीटाने त्यात हळद, तिखट धणेपूड मसाला व मीठ टाकून चांगले एकञ करावे.नंतर बारीक केलेले मक्याचे दाणे घालावे. 2-4 मिनीट झाकून वाफ येऊ द्यावी.

आता त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून छान मिक्स करावे. आवडत असल्यास 1/2 टीस्पून साखर घालावी. सारण तयार झालेय.

आता भिजवलेला मैदा पुन्हा एकदा चांगला मळून घ्यावा. त्याचे मोठ्या पेढ्याएवढे गोळे करुन घ्यावे. नंतर एक गोळा घेवून पोळीच्या जाडीची पोळी लाटून घ्यावी.

त्यावर मध्ये सारण घालावे. आणि पोळीची चौकोनी घडी घालून पॉकेट तयार करावे. याप्रमाणे सर्व पाॕकेट तयार करेपर्यंत कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल चांगले गरम झाले की त्यात तयार पॉकेट सोडावे. आणि मध्यम सोनेरी रंग येईपर्यंत तळावे. अशाप्रकारे सर्व तळून घ्यावे.

आपले मसाला कॉर्न पॉकेट तयार आहेत.

नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.