How To Make Methi Paratha : अनेक तरुण मंडळींना पालेभाजी खायला अजिबात आवडत नाही. पण, अनेकदा डॉक्टर आपल्याला आहारात पालेभाज्यांचा समावेश करण्यास सांगतात. त्यामुळे आजारी पडून औषधे घेण्यापेक्षा आपल्या जेवणाच्या ताटातला एक कोपरा पालेभाजीला द्या. भाजी खरेदीसाठी जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तेव्हा असंख्य प्रकारच्या पालेभाज्या तुम्हाला दिसतात. पण, जर तुम्हाला या पालेभाज्या खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही एका पालेभाजीचा मऊसूत पराठा बनवू शकता. तर ही पालेभाजी आहे मेथी. आजपर्यंत तुम्ही बटाटा, पनीर, बीटचे पराठे खाल्ले असतील. पण, आज आपण मेथीचे पराठे (Methi Paratha Recipe) कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
साहित्य (Methi Paratha Ingredient )
एक मेथीची जुडी
दोन कांदे
लसणीच्या पाच ते सहा पाकळ्या
चार वाट्या गव्हाचे पीठ
दोन चमचे बेसनचे पीठ
आल्याचा तुकडा
बटर किंवा तेल
दही
तेल
चवीनुसार मीठ
कृती (How To Make Methi Paratha)
एक मेथीची जुडी निवडून साफ करून घ्या.
नंतर पाण्याने धुवा आणि चिरून घ्या.
दुसरीकडे दोन कांदे, लसणीच्या पाच ते सहा पाकळ्या, आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ मिस्करच्या भांड्यात घाला आणि बारीक करून घ्या.
गॅसवर कढई ठेवा आणि एक वाटी तेल गरम करून घ्या.
मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं मिश्रण तेलात टाका आणि व्यवस्थित भाजून घ्या.
नंतर त्यात चिरून घेतलेली मेथी घाला आणि एक मिनिटे वाफवून घ्या आणि गॅस बंद करा.
नंतर परातीत एक वाटी दही, चार वाट्या गव्हाचे पीठ, दोन चमचे बेसनचे पीठ घ्या. त्यात वाफवून घेतलेली भाजी घालून पीठ मळून घ्या. दहा ते पंधरा मिनिटे असच ठेवा.
मग त्याच्या पोळ्या लाटून घ्या आणि बटर किंवा तेल लावून भाजून घ्या.
अशाप्रकारे तुमचे ‘मेथीचे पराठे’ तयार (Methi Paratha Recipe).
मेथीचे पराठे (Methi Paratha Recipe) बनवल्यानंतर चार दिवसांपर्यंत ते चांगले राहतात. तुम्ही हिवाळ्यात एखाद्या सहलीला किंवा गावी जात असाल, तर तुम्ही हे पराठे तुमच्या डब्यातून घेऊन जाऊ शकता. तसेच मुलांच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या सकाळच्या डब्यासाठी हा पदार्थ अगदीच बेस्ट ठरेल.त्याचबरोबर मेथीच्या भाजीत अनेक मिनरल्स आणि विटॅमिन आढळतात. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी देखील मेथीची भाजी फायदेशीर मानली जाते. यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही याची मदत होते.