स्ट्रीट फूडसाठी महाराष्ट्र खूप प्रसिद्ध आहे. वडा पावापासून भेळपुरीपर्यंत आणि रगडा पॅटीसपासून बाकरवडीपर्यंत प्रत्येक पदार्थाची स्वतःची वेगळी ओळख आहे. त्यात मिसळ पावालाही वेगळे स्थान आहे. प्रत्येक शहरात मिळणारी मिसळची चव ही वेगळी आहे. विशेष म्हणजे तुम्ही मिसळ पाव स्नॅक्सपासून ते लंच किंवा डिनरपर्यंत कधीही खाऊ शकता. मोड आलेले कडधान्य, फरसाण, मसाल्यांचा आंबट गोड, तिखट चव या डिशला आणखी वेगळे बनवते. जर तुम्ही मिसळ पावाचे चाहते आहात तर मग ही क्रंची मिसळ नक्की ट्राय करा.
क्रंची मिसळ साहित्य –
- १ वाटी कडधान्यांची उसळ (मटकी, मूग, चवळी, मसूर अशी कुठलीही उसळ चालेल)
- दोन बारीक चिरलेले कांदे, एक बारीक चिरलेला टोमॅटो
- मूठभर कोथिंबीर बारीक चिरून
- अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे (खारे दाणे)
- भेळेसाठी वापरतो त्या चटण्या (चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी)
- ओलं खोबरं (किसलेले),लसूण पाकळ्या
- कढीपत्ता, कोथिंबीर, लिंबू, किंचितसा गुळ
- फरसाण, पाव
क्रंची मिसळ कृती –
सर्वप्रथम मोड आलेली मटकी धुवून घ्या. त्यात थोडीशी हळद, मीठ आणि पाणी टाका. ते प्रेशर कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्यावी. मिसळ पावचा मसाला तयार करण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करावे. त्यात आले, कांदा, लसूण, ओले खोबरे, टोमॅटो टाकून पेस्ट तयार करा.आता एका मोठ्या कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि थोडा कढीपत्ता घालावा. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर आणि गरम मसाला घाला. आता मसाले सुवासिक होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावे.नंतर त्यात तयार मसाला पेस्ट घालून चांगले परतून घ्या.मसाला पेस्टपासून तेल वेगळे होईपर्यंत शिजवा.नंतर त्यात शिजलेली मटकी, गुळाचा छोटा तुकडा आणि मीठ घालावे. नंतर पाणी घालून चांगले शिजवा. मिसळ पूर्णपणे शिजेपर्यंत झाकण ठेवा आणि उकळवा. जेव्हा तेल वरती तरंगायला लागेल तेव्हा समजावे की मिसळ तयार आहे.
हेही वाचा – Rasam Recipe: पावसात बनवा गरमागरम रस्सम, लगेच नोट करा सोपी रेसिपी
वाढताना एका मोठ्या बाऊलमध्ये उसळ घ्यावी. आवडत असल्यास त्यात तिखट किंवा गोड चटणी मिसळून घ्या. वरती बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर पसरवा. शेवटी भाजलेले खारे दाणे घालून खाण्यास द्या.