Mix Vegetable Pickle Recipe in Marathi : भारतात लोक मुख्य जेवणाबरोबर वेगवेगळ्या चटणी, लोणच्यांचं सेवन करतात. लोणचे हा शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोणचे खाल्ल्याशिवाय काही जणांचे जेवण पूर्ण होत नाही; तर काही जण जेवणाची चव वाढवण्यासाठी लोणचे खातात. आंबा, कैरी, लिंबूच्या लोणच्याचे सेवन अधिक प्रमाणात केले जाते. पण, तुम्ही कधी मिक्स भाज्यांचे लोणचं खाल्लं आहे का? नाही… तर आज आम्ही तुम्हाला मिक्स भाज्यांचं लोणचं (Mix Vegetable Pickle) कसं करायचं हे सांगणार आहोत. चला तर पाहुयात साहित्य आणि कृती…

साहित्य : (Mix Vegetable Pickle Ingredients)

१. एक वाटी मटारचे दाणे
२. एक वाटी फ्लॉवर (बारीक चिरून)
३. एक वाटी गाजर( बारीक तुकडे करून घ्या)
४. अर्धी वाटी आंबेहळद
५. अर्धी वाटी माईनमुळा (बारीक चिरून घ्या)
६. एक वाटी चवळी शेंगेतील दाणे
७. एक वाटी वालपापडीतील कोवळे वाल
८. एक मोठा चमचा लिंबू किंवा कैरी लोणच्याच्या मसाला
९. दोन ते तीन वाट्या लिंबाचा रस
१०. फोडणीसाठी – तेल, हिंग, मोहरी
११. मीठ

हेही वाचा…Sabudana Tokri Chaat : खिचडी, वडे खाऊन कंटाळलात? मग बनवा ‘साबुदाणा कटोरी चाट’

कृती :

१. सर्व भाज्या रात्री मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा.
२. दुसऱ्या दिवशी चाळणीत ठेवा.
३. नंतर सगळ्या भाज्या लोणच्याचा मसाला घालून कालवून घ्या.
४. फोडणीसाठी टोपात एक तेल घ्या. नंतर त्यात हिंग, मोहरी घाला.
५. नंतर फोडणी थंड झाल्यावर भाज्यांवर ओतावी.
६. त्यानंतर तयार लोणचं काचेच्या पारदर्शक बरणीत भरून ठेवावे.
७. वरून लिंबाचा रस ओतावा, हा रस लोणच्यावर पाच-सहा इंच आला पाहिजे.
८. हे लोणचं पाच ते सहा दिवस खराब होत नाही.
९. तसेच फ्रिजमध्ये ठेवले तर पंधरा दिवस टिकून राहते.
१०. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यांचेसुद्धा लोणचं बनवू शकता.
११. अशाप्रकारे तुमचे मिक्स भाज्यांचे लोणचं तयार ((Mix Vegetable Pickle).

एरवी आपण आंबा, कैरी, लिंबू अगदी मिरचीचे सुद्धा लोणचं खातोच. पण, यंदा तुम्ही मिक्स भाज्यांचे लोणचं नक्की (Mix Vegetable Pickle)बनवून बघा. कारण – थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात भाज्या उपल्बध असतात. कमी दिवस टिकणारे पण अतिशय चविष्ट आणि शरीरासाठी पौष्टीक असलेलं हे लोणचं तुम्ही पोळी, भात, खिचडी, पुलावबरोबर खाऊ शकता आणि जेवणाची रंगत वाढेल. त्याचबरोबर चटपटीत लोणच्याबरोबर अनेक भाज्याही चवीसहित, नाक न मुरडता पोटातही जातील.