Monsoon recipe: पावसाळ्यात खिडकीत बसून पावसाचा आनंद घेत कुरकुरीत कांदा भजी खाण्याची मजा काही औरचं असते. कांदा भजी बनवण्यासाठी मुख्यत्वे बेसनाचा वापर केला जातो. परंतु काहीजण स्वास्थ्याच्या कारणास्थव बेसनाचं सेवन करणं टाळतात. तेव्हा बेसनाशिवाय कुरकुरीत कांदा भजी कशी बनवावी याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
बेसनाशिवाय कांदा भजी साहित्य :
२ मध्यम आकाराचे गोल कांदे
एक किंवा दोन कप तांदळाचं पीठ/ मुगाच्या डाळीचं पीठ
एक किंवा दोन चमचे लाल तिखट
एक चमचा चाट मसाला
एक चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिर्चीची पेस्ट
एक ते दोन चमचे जीरा पावडर
एक ते दोन कप चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ, दोन चमचे पाणी
बेसनाशिवाय कांदा भजी कृती :
१. सर्वप्रथम कांदे कापून घ्या. तुम्हाला कुरकुरीत खेकडा भजी करण्यासाठी कांदे बारीक स्लाईस करून कापून घ्या. कापलेला कांदा एका भांड्यात घेऊन त्यात एक ते दोन कप तांदळाचं पीठ किंवा मुगाच्या डाळीचं पीठ टाका.
२. मग त्यावर एक ते दोन चमचे लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, एक चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिर्चीची पेस्ट, एक ते दोन चमचे जीरा पावडर, एक ते दोन कप चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून एकत्र मिक्स करून घ्या.
३. मिश्रण एकजीव केल्यावर त्यात सर्वप्रथम एक चमचा पाणी घाला. पीठ कांद्याला चांगलं कोट होऊ द्या. मग आवश्यक असल्यास त्यात पुन्हा एक चमचा पाणी घाला. मिश्रण ५ मिनिटं बाजूला झाकून ठेवा आणि कढईत तेल गरम करायला ठेवा.
४. तुम्हाला किती भजी करायच्या आहेत हे लक्षात घेऊन मग तेवढं तेल कढईत तापवायला ठेवा. साधारणपणे अर्धी कढई तेल घ्या. तेल खूप जास्त तापवू देऊ नका. तेल जास्त तापल्यास भजी करपतात आणि मग आतून कच्च्या राहतात.
हेही वाचा >> विदर्भ स्पेशल झिंगा फ्राय मसाला; पटकन नोट करा सोपी झणझणीत रेसिपी
५. तेल तापल्यावर त्यात एक भजी टाकून बघा. ती व्यवस्थित कुरकुरीत झाली की मग इतर भजी करायला घ्या. अशा प्रकारे तुम्ही बेसनाशिवाय कुरकुरीत कांदा भजी तयार करू शकता.