मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. बऱ्याचदा खाण्यासाठी मुळ्याच्या कंदाचा वापर करण्यात येतो तर मुळ्याची पाने टाकून देण्यात येतात. परंतु असे करणे चुकीचे आहे. मुळ्याच्या पानांचा खाण्यामध्ये समावेश करणे अत्यंत उपयुक्त ठरते. मुळ्याचा समावेश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. मुळ्यात प्रथिनं, करबोदकं, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. चला तर मग आज मुळ्याचे रायते बनवुयात

मुळ्याचे रायते साहित्य

अर्धा मुळा

अर्धा ते पाऊण वाटी दही

१ टीस्पून साखर

२ हिरव्या मिरच्या आणि ५ ते ७ कडिपत्त्याची पाने

१ टीस्पून मोहरी आणि जिरे

चिमूटभर हिंग

चवीनुसार मीठ

फोडणीसाठी तेल

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

मुळ्याचे रायते कृती

सगळ्यात आधी मुळा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर त्याची सालं काढून तो किसून घ्या.

किसलेला मुळा एका भांड्यात काढा. मुळा किसण्यासाठी मध्यम आकाराची छिद्रं असणारी किसनी वापरावी.

दही फेटून घ्या आणि त्यानंतर किसलेल्या मुळ्यामध्ये घाला. त्याचवेळी त्यामध्ये चवीनुसार साखरही घाला.

आता गॅसवर एक छोटी कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाली की तेल, मोहरी, जिरे, हिंग, मिरच्यांचे तुकडे आणि कडिपत्ता टाकून फोडणी करून घ्या.

छान तडतडलेली खमंग फोडणी मुळ्याच्या रायत्यामध्ये घाला त्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या.

हेही वाचा >> थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

जेव्हा तुम्ही रायतं पानात वाढून घेणार असाल त्याच्या अगदी आधी त्यात मीठ घाला. कारण रायत्यामध्ये मीठ घातलं की लगेच त्याला पाणी सुटतं. या रेसिपीने केलेलं रायतं एकदा जेवणात तोंडी लावून पाहाच..

Story img Loader