नीलेश लिमये
तुम्हा सर्वाना ईदीच्या खूप्प खूप्प शुभेच्छा. बिर्याणी आणि शीर कुर्मा तर खाल्ला असेलच आणि त्याची चव पण जिभेवर रेंगाळत असेल, पण आजचा बेत काय? आज आपण करू या हरिरा सूप. सूप असलं तरी जरा पोटाला विश्रांती दिल्यासारखा पण वाटेल आणि थोडी अजून मटणाची चव पण जिभेवरून जात नसेल तर हे सूप नक्कीच करा.
साहित्य
२ टीस्पून ऑलिव्ह ऑइल
१ कांदा बारीक चिरलेला
१०-१२ लसणाच्या पाकळ्या चिरून घ्या
२ टीस्पून काश्मिरी मिर्च पावडर
केशराच्या काही चकत्या
२०० ग्राम टोमॅटो प्युरी
२ टोमॅटो मिक्सरमधून पेस्ट करून घ्या
२ गाजरं बारीक चिरून घ्या
१ चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड
१ टीस्पून काली मिर्च पावडर
१ टीस्पून साखर आंबट पण घालवण्यासाठी
१ वाटी उकडलेले छोले किंवा राजमा
चिकन किंवा मटणाचे पिसेस शिजवलेले
चिकन स्टॉक किंवा मटण स्टॉक
ओरेगॅनो, दालचिनी पूड, झटार मसाला (अरेबिक मसाला असतो. नसला तर दगड फूल अगदी थोडय़ा प्रमाणात वापरा.)
पार्सली
लिंबू
कृती :
एका पातेल्यात किंवा भांडय़ात तेल घेऊन कांदा, लसूण आणि टोमॅटो पेस्ट चांगली परतून घ्या. त्यात टोमॅटो प्युरी घाला आणि स्टॉक घालून चांगले उकळू द्या. चांगले उकळले की मिक्सरमधून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट गाळून घ्या. त्यामध्ये अजून थोडा स्टॉक घाला. ह्यत छोले, मसाले आणि तिखट घालून पुन्हा चांगले उकळून घ्या. मीठ मिरपूड चवीनुसार घाला. सूप तयार झालं की बाउलमध्ये मुततनाचे पिसेस घाला आणि वरून सूप वाढा. लिंबाचं साल ग्रेट करून त्यावर शिंपडा आणि पार्सलीने गार्निश करा. मस्त गरम गरम सूप तयार.