Mutton Keema Kabab Recipe In Marathi: सध्या रमजानचा महिना सुरु आहे. या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम बांधव सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास करत असतात. या कालावधीमध्ये ते पाणी देखील पीत नाहीत. संध्याकाळ झाल्यानंतर ते दिवसभर केलेला उपवास सोडतात. उपवास सोडल्यावर मुस्लिम बांधव जे खास पदार्थ खातात किंवा ज्या पदार्थांनी ते उपवास सोडतात, त्यांना इफ्तार असे म्हटले जाते. इफ्तार पार्टीमध्ये वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांचा समावेश असतो. रमजानचा महिना सुरु झाल्यावर खाद्यप्रेमी मोहम्मद अली रोडकडे वळतात. नॉन व्हेज खाण्यासाठी लोक प्रामुख्याने त्या ठिकाणी जमतात. या खाद्यसंस्कृतीमध्ये मटण खिमा कबाब हा पदार्थ खूप लोकप्रिय आहे. कबाब खाण्यासाठी म्हणून लोक दुकानांसमोर रांगा लावून उभे असतात. पण हा पदार्थ खाण्यासाठी ठराविक जाणे फार त्रासदायक होऊ शकते. अशा वेळी घरच्या घरी कबाब तयार करुन खाऊ शकता. चल तर मग जाणून घेऊया मटण खिमा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी..
साहित्य:
- अर्धा किलो खिमा
- ८ ते १० लसूण पाकळ्या
- १ इंच आलं
- ४-५ हिरव्या मिरच्या
- मीठ चवीनुसार
- १ चमचा गरम मसाला
- तळण्यासाठी तेल
- २ अंड्यांच्या पांढरा भाग
- कोथिंबीर
- हळद अर्धा चमचा
कृती:
- लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर यांचे बारीक वाटण वाटून घ्या.
- ते मटणाच्या खिम्याला लावून घ्या.
- पुढे कुकरमध्ये खिमा, मीठ, अर्धा चमचा हळद लावून थोडे पाणी टाकून उकडवून घ्या.
- पाच ते सहा शिट्या घ्या.
- मऊ शिजलेला खिमा पाणी राहिले असल्यास कोरडा करुन घ्या.
- थंड झाल्यावर त्याचे लिंबाएवढे गोळे करुन घ्या.
- अंडे फेटून घेऊन त्यात थोडेसे मीठ घाला.
- त्यात खिम्याचे गोळे बुडवून शॅलो फ्राय करा.
- सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर वाढा.
आणखी वाचा – उन्हाळ्यात ‘कोकम’कढीनं पोटाला द्या गारवा, पाहा सोपी पारंपरिक रेसिपी
(मटण खिमा कबाबची ही रेसिपी लोकसत्ता पूर्णब्रह्ममधून घेण्यात आली आहे.)