Healthy Nachani Dhokla Recipe: आपल्याकडे साधारणपणे गहू, तांदूळ, ज्वारी यांचा आहारात समावेश होतो. अशातच आपण ज्वारी, नाचणी यांच्या भाकऱ्या आवर्जून करतो. पण, नाचणी केवळ भाकरीपूरतीचं मर्यादित नसून वेगवेगळे पदार्थ करुन तिचा आहारात समावेश करता येऊ शकतो. तर आज आपण त्याचपैकी एक ‘नाचणीचा ढोकळा’ (Healthy Nachani Dhokla) कसा बनवायचा हे पाहणार आहोत. लहान बाळांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच हा पदार्थ नाश्ता किंवा ऑफिस टिफिनसाठी बेस्ट ठरेल. चला तर जाणून घेऊ पौष्टीक पदार्थाची साहित्य आणि कृती…
साहित्य –
१. १/२ कप नाचणीचे पीठ
२. १/२ कप रवा
३. १/४ कप दही
४. ३/४ पाणी
५. एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट
६. किसलेलं गाजर
७. इनो
८. मीठ, मोहरी, हिंग, कढिपत्ता
कृती –
१. एका भांड्यात नाचणीचे पीठ घ्या.
२. त्यात रवा, दही, पाणी, मीठ घाला आणि व्यवस्थित मिक्सर करून घ्या.
३. मिश्रण १५ ते २० मिनिटे तसंच ठेवून द्या.
४. नंतर या मिश्रणात हिरव्या मिरचीची पेस्ट, तुमची एखादी आवडती भाजी (उदाहरणार्थ – गाजर किसून घाला)
५. परत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाच मिनिटे तसंच राहू द्या.
६. एका ताटाला तेल लावा.
७. दुसरीकडे मिश्रणात इनो आणि थोडं पाणी घाला.
८. मिश्रण एकजीव करून तेल लावलेल्या प्लेटमध्ये पसरवून घ्या आणि वरून कोथिंबीर, लाल तिखट घाला.
९. गॅसवर कढई ठेवा. त्यामध्ये पाणी घालून त्यावर रिंग ठेवा. मिश्रण ठेवलेलं ताट १८ ते २० मिनिटे त्यामध्ये ठेवा.
१०. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या. नंतर एक चमचा तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या तुकडे आणि तीळ घालून फोडणी करून ढोकळ्यावर ओता.
११. अशाप्रकारे तुमचा नाचणीचा ढोकळा तयार.
सोशल मीडियाच्या @manthangattani या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रेसिपी घेण्यात आली आहे. प्रत्येक घरामध्ये ज्वारी, बाजरी किंवा तांदुळाची भाकरी करण्यात येते. मात्र, नाचणीची भाकरी फार क्वचित केली जाते. पण, नाचणीचा आहारात समावेश अगदी महत्वाचा आहे. नाचणी अत्यंत पौष्टिक असून शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे.