Shardiya Navratri 2023: नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानिमित्त अनेकजण उपवास करतात. यावेळी उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यात साबुदाण्याची खिचडी, वरईचा भार, साबूदाणे किंवा जास्तीत जास्त रताळ्याचा किस असे पदार्थचं नेहमी बनवले जातात. पण उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आम्ही तुम्हाला एक हटके पदार्थ सांगणार आहोत. जो चवीला कुरकुरीत आणि स्वादिष्ट आहे. आज आपण उपावासासाठी शिंगाड्याच्या पीठापासून चकल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. विशेष म्हणजे या चकल्या तुम्ही उपवासासाठीच नाही तर इतरवेळीही बनवून खूप दिवस स्टोर करुन खाऊ शकता.
शिंगाड्याच्या पीठापासून चकल्या कशा बनवायच्या
साहित्य
शिंगाडयाचे पीठ १ वाटी, नाचणीचे पीठ पाव वाटी, भिजवलेला साबुदाणा १ वाटी, जिरे १ चमचा, मिरची पावडर पाव चमचा, साखर, उकडलेल्या बटाटयाचा किस १ वाटी, चवीपुरतं मीठ.
हेही वाचा – ना थापता अगदी सोप्या पद्धतीने बनवा लुसलुशीत तांदळाची भाकरी; पटकन Video तील पद्धत करा नोट
कृती
सर्वप्रथम एका बाऊलमध्ये शिंगाडा आणि नाचणीचं पीठ, साबूदाणा, बटाब्याचा किस, भाजलेले जिरे १ चमचा, तिखट, मीठ, साखर सगळं एकत्र करून घ्या, आता हे मिश्रण कोमट पाण्यात भिजवून चांगले मळून घ्या. पीठ चांगल्याप्रकारे मळून झाल्यानंतर चकलीच्या साच्याकडून लहान लहान चकल्या पाडाव्यात. आता ह्या चकल्या उन्हात चांगल्या वाळवून घ्या. या चांगल्या वाळल्यानंतर तुम्ही हव्या तेव्हा तळून खावू शकता. वाळवलेल्या चकल्या हवाबंद डब्यात ठेवल्यास खूप दिवस टिकतात.