दिवाळी म्हटले की फराळ हा येतोच. लाडू, चकली, चिवडा, गोड शंकरपाळे हे प्रत्येक घरात तयार होत आहेत. त्यासोबतच बाहेरून आणलेली मिठाई, चॉकलेट, लाडू, अनारसे या पदार्थांचीसुद्धा दिवाळीच्या पाचही दिवसांमध्ये रेलचेल असते. अशातच तोंडाची गुळचट झालेली चव बदलण्यासाठी, तोंडात टाकण्यासाठी काहीतरी चटपटीत पदार्थ हवा असतो. मग सतत चिवडा व चकली खाण्याऐवजी रव्यापासून बनवलेले शंकरपाळे हा एक मस्त चटपटीत पर्याय आहे.
इन्स्टाग्रामवरील @savorytales या सोशल मीडिया हँडलने आपल्या अकाउंटवर या झटपट तयार होणाऱ्या, चटपटीत रव्याच्या शंकरपाळ्यांच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला आहे. चला मग हे रव्याचे चटपटीत शंकरपाळे कसे तयार करायचे ते बघू…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Viral : वाळू शिल्पकाराने वाढदिवसानिमित्त किंग कोहलीला दिली खास भेट; वाळूवर साकारलं त्याचं ‘विराट’ शिल्प

साहित्य :

१ वाटी रवा

२ छोटे चमचे तेल किंवा तूप

१/२ चमचा मीठ

पाणी

कृती :

सर्वप्रथम एक वाटी रवा घेऊन, तो मिक्सरला फिरवून घेऊन, त्याची बारीक पावडर करून घ्या.

आता त्यामध्ये एक चमचा तेल आणि थोडे मीठ घालून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित गोळा करून, गरज असेल त्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून मळून घ्या. मळून घेतलेले हे मिश्रण अगदी घट्टही नको आणि अगदी सैलदेखील नको.

आता शंकरपाळ्यांची कणीक १५ ते २० मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवा. थोडा वेळ झाकून ठेवलेली ही कणिक पोळपाटावर ठेवून त्याची अगदी पातळ पोळी लाटून घ्या.

लाटलेल्या पोळीचे सुरीने छोट्या छोट्या चौकोनी आकारात कापून तुकडे करून घ्या किंवा तुम्हाला आवडेल त्या आकारात कापून घ्या.

गॅसवर एका खोल कढईत मध्यम आचेवर तेल तापवत ठेवा. तेल कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये कापून घेतलेल्या शंकरपाळ्यांचे तुकडे एक-एक करून सोडा.

या शंकरपाळ्यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या आणि नंतर कढईतून त्या बाहेर काढून घ्या.

आता या तयार झालेल्या शंकरपाळ्यांवर थोडे लाल तिखट आणि आवडत असल्यास चाट मसाला घालून, या रव्याच्या चटपटी शंकरपाळ्यांचा आस्वाद घ्या.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No maida shankarpali recipe for diwali snacks dha
Show comments