नीलेश लिमये
‘नो नीड ब्रेड’ म्हणजे ना मळता बनवलेला ब्रेड. आहे ना इंटरेस्टिंग? हा ब्रेड इराणी ब्रूनसारखा आहे म्हणजे उद्याच्या नाश्त्याला ब्रून- बटरची मेजवानी आणि सोबत मस्त फक्कड चहा!
साहित्य
* ५०० ग्राम मैदा,
* दीड चमचा मीठ,
* ३० ग्राम यीस्ट (सुके किंवा फ्रेश) आणि चिमूटभर साखर
* २ कप कोमट पाणी
कृती :
ब्रेड करताना ईस्ट भिजवण्याची काळजी घ्यायची असते. एका वाटीत यीस्ट, साखर, १ टीस्पून मैदा एकत्र करा आणि त्यात दोन ते तीन चमचे कोमट पाणी घालून ‘पेस्ट’ तयार करा. हे मिश्रण दहा मिनिटे ठेवा. यालाच ‘यीस्ट कल्चर’ असे म्हणतात. आपण दह्यासाठी विरजण वापरतो, तसेच हे कल्चर वापरायचे आहे.
आता मैदा, मीठ एकत्र चाळून घ्या. त्यात ‘यीस्ट कल्चर’ करून त्यात उरलेले कोमट पाणी घालून मिश्रण चांगले ढवळून त्याचा लगदा होऊ द्या. आता थोडे थोडे पाणी टाकून कणकेचा गोळा होईतपर्यंत मिसळा. हा गोळा भांडय़ात झाकून रात्रभर(दहा ते बारा तास) थंड जागेवर ठेवा (फ्रिजमध्ये नको!).
दुसऱ्या दिवशी हा गोळा फुगलेला असेल व हलकापण असेल. आता ओव्हन १८० अंश सेल्सियसवर ‘प्रीहिट’ करा. एका केकटिनमध्ये मैदा शिंपडून हलक्या हाताने ठेवा. ३० मिनिटे गोळ्यावर झाकण ठेवून बेक करा आणि नंतर दहा-बारा मिनिटे झाकण काढून ब्रेड सोनेरी होईपर्यंत बेक करा.
हा ब्रेड गार झाल्यानंतर कडक मस्त ‘ब्रून’ लोणी किंवा बटरसोबत किंवा चहाच्या कपात बुडवून त्याचा आस्वाद घ्या.