Oats Chocolate Cookies: सध्या सर्वांना आपल्या फिटनेसची चिंता आहे. शारीरिक स्थिरता मिळवण्यासाठी लोक जिममध्ये जातात, व्यायाम करतात. व्यायाम करताना योग्य डाएट फॉलो करणे आवश्यक असते. आरोग्याबाबत काळजी घेणाऱ्या लोकांच्या आहारामध्ये ओट्स हा पदार्थ हमखास आढळतो. सकाळी किंवा संध्याकाळी नाश्ताला ओट्स खाल्ले जातात. काहींना हा पदार्थ इतका आवडतो की, ते ओट्स खाऊन मगच व्यायाम करतात.
काही वेळेस काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खायचं असेल तर लोकांना ओट्स खायला कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही ओट्स आणि चॉकलेट यांपासून तयार केल्या जाणाऱ्या कुकीज नक्की ट्राय करु शकता. हा पर्याय हेल्दी आणि टेस्टी दोन्ही आहे. या कुकीज घरच्या घरी बनवता येतात. लहान मुलांना पौष्टिक नाश्ता म्हणून त्यांना या कुकीज खायला देऊ शकता. हा पदार्थ बनवण्याची सोपी रेसिपी आम्ही खास लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील घेऊन आलो आहोत.
साहित्य:
- अर्धा कप ओट्स (जाडसर स्वरुपात मिक्सरमधून बारीक केलेले)
- अर्धा कप गव्हाचं पीठ
- अर्धा कप पिठीसाखर
- २ चमचे कोको पावडर
- पातळ केलेलं साजूक तूप
- बारीक केलेला अर्धा कप सुकामेवा
- २ ते ३ चमचे दूध
- १ चमचा चॉकलेट इसेन्स
- पाव चमचा मीठ
कृती:
- सर्वप्रथम ओट्स, गव्हाचं पीठ, पिठीसाखर, कोको पावडर, मीठ, सुका मेवा एकत्र करा.
- त्यानंतर तयार झालेले मिश्रणामध्ये आधीच पातळ करुन थंड केलेले तूप थोडे थोडे करुन घालत ते मिश्रण एकत्र करा.
- मिश्रण एकत्र करत असाताना दुधाचा हबका मारा. पुढे त्यामध्ये चॉकलेट इसेन्स टाका.
- वरील पीठ पूर्णत: तुपाने भिजवून त्याचे छोटे गोळे तयार करा किंवा आपल्याला हव्या त्या आकाराचे चपटे गोळे तयार करा.
- मायक्रोवेव्ह ओव्हन १८० डिग्री प्री-हीट करा. पुढे मायक्रोवेव्ह सेफ ट्रेवर बटर पेपर ठेवा आणि त्यावर तयार चपटे गोळे ठेवा.
- मायक्रोवेव्ह प्रीहिट झाल्यावर त्यात ट्रे ठेवा आणि २५ ते ३० मिनिटं बेक करा.
आणखी वाचा – भूक लागलीये? झटपट बनवा खुशखुशीत डाळ वडा; लगेच पाहा सोपी रेसिपी
तयार झालेल्या कुकीज मायक्रोवेव्हमधून काढताना नीट काळजी घ्यावी. या हेल्दी तुम्ही कुकीज दूधाबरोबर किंवा चॉकलेट सिरपबरोबर खाऊ शकता. प्री वर्कआऊटच्या आधी हे खाल्याने व्यायाम करताना फायदा होईल. वर दिलेली रेसिपी वाचून ओट्सचे कुकीज बनवल्यावर त्यांची चव कशी होती याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.