Paneer Sandwich Pakoda Recipe: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने एन्ट्री मारली आहे. पाऊस पडत असताना अनेकदा गरमागरम चहा प्यायची इच्छा तर होतेच पण त्याचबरोबर भजी, पकोडे असे पदार्थ खाण्याचा मोह आवरत नाही. पण नेहमी तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि खुसखुशीत, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया स्टार्टरचा प्रकार असलेल्या पनीर सॅंडविच पकोडाची रेसिपी.

पनीर सॅंडविच पकोडा साहित्य

२ बटाटे (उकडलेले आणि मॅश केलेले)

२०० ग्रॅम पनीर (कापलेले)

२ टीस्पून तेल

२-३ लसूण पाकळ्या (चिरलेल्या)

१ टीस्पून आले (ठेचून)

१ हिरवी मिरची (चिरलेली)

१ कांदा (चिरलेला)

मीठ (चवीनुसार)

½ टीस्पून हळद पावडर

१ टीस्पून लाल मिरची पावडर

१ टीस्पून किचन किंग मसाला

कोथिंबीरची पाने (चिरलेली)

काळी मिरी पावडर (आवश्यकतेनुसार)

१ कप बेसन

¼ टीस्पून बेकिंग सोडा

पाणी (आवश्यकतेनुसार)

½ कप मॉझरेल्ला चीज (चिरलेला)

पुदिन्याची चटणी (आवश्यकतेनुसार)

तेल (तळण्यासाठी)

हेही वाचा… वांग्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग झटपट करा ‘भरलेल्या वांग्याचे रोल्स’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

कृती

१. प्रथम स्टफिंग/सारण तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये २ टीस्पून तेल घ्या. त्यात आधी बारीक चिरलेली लसून आणि आलं घालून परतून घ्या. मग त्यात बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घाला व चवीप्रमाणे मीठ घाला.

त्यानंतर या स्टफिंगमध्ये ½ टीस्पून हळद, मिरची पावडर आणि किचन किंग मसाला घाला. लक्षात ठेवा कांदा जास्त शिजवून घ्यायचा नाही आहे.

यानंतर त्यावर कोथिंबिर घाला व उकडून मॅश्ड केलेले बटाटा घालून घ्या.आता हे स्टफिंग थंड होऊ द्या.

२. २०० ग्रॅम पनीर घेऊन त्याचे समांतर चार भाग करून घ्या. त्यानंतर प्रत्येक पनीरच्या तुकड्याचे दोन भाग करून घ्या आणि अशाप्रकारे सर्व पनीर कापून घ्या.

पनीर मॅरिनेट करण्यासाठी मीठ आणि काळी मिरी पावडर पनीरवर टाकून ती दोन्ही बाजूने सगळीकडे नीट लावून घ्या. पनीर मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्या.

३. आता एका बाउलमध्ये १ कप बेसन घ्या. त्यात चवीप्रमाणे मीठ आणि ¼ चमचा सोडा घाला. ते मिक्स करून घ्या. आता थोडं थोडं पाणी घालून मध्यम प्रमाणात हे बॅटर तयार करून घ्या. १० मिनिटे तसंच बाजूला ठेवा.

४. आता बटाट्याच्या थंड झालेल्या स्टफिंगमध्ये ½ कप मॉझरेल्ला चीज घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या.

५. पनीरच्या मॅरिनेट केलेल्या तुकड्यानर पुदीन्याची चटनी आणि तयार केलेले स्टफिंग लावून घ्या. तसंच दुसऱ्या पनीरच्या तुकड्यालाही पुदिना चटणी लावून तो पीस पनीरवर ठेवा. अशाप्रकारे सॅंडविच तयार करून घ्या.

६. आता हे सॅंडविच बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्या. अशाप्रकारे तुमचं पनीर सॅंडविच तयार आहे. हे तुम्ही टोमॅटो केचअपबरोबरदेखील सर्व्ह करू शकता.

ही रेसिपी ‘रुचकर मेजवानी’ यांच्या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.