पितृपक्षात पूर्वजांसाठी पूर्वापार चालत आलेल्या पदार्थात नैवैद्यासाठी वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा. नैवैद्यासाठी वड्यांची परफेक्ट रेसिपी पाहुयात कशी बनवायची. वड्यांचा भरडा तयार करण्यापासून ते वडे तळण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप कशा करायच्या हे आता आपण पाहूयात…
वडे साहित्य –
- तांदूळ – १ भांडे
- हरभरा डाळ – पाव भांडे
- उडीद डाळ – पाव भांडे
- धणे – पाव भांडे
- जीरे – २ चमचे
- मेथ्या – अर्धा चमचा
- हिंग – पाव चमचा
- हळद – अर्धा चमचा
- तिखट – अर्धा चमचा
- मीठ – चवीनुसार
- तीळ – २ चमचे
- कोथिंबीर – अर्धी वाटी – बारीक चिरलेली
- तेल – २ वाट्या
वडे कृती –
- तांदूळ स्वच्छ धुवून त्यातले सगळे पाणी काढून घ्या आणि अर्धा तास पंख्याखाली एका कापडावर पसरुन ठेवा.
- हरभरा डाळ, उडीज डाळ, धणे, जीरे आणि मेथ्या सगळे एकत्र करुन ठेवायचे.
- कढई पूर्ण तापवून गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा तास वाळलेले तांदूळ घालून ते चांगले परतून घ्यायचे.
- तांदूळ पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये डाळींचे एकत्र केलेले मिश्रण घालायचे आणि सगळे पुन्हा चांगले हलवून घ्यायचे. कढई गार होईपर्यंत सगळ्या गोष्टी एकत्रच ठेवायच्या.
- आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करुन घ्यावे. एकदम बारीक पावडर न करता थोडी जाडसर पावडर करा.
- हा भरडा घेऊन यामध्ये तिखट, हळद, हिंग, मीठ, तीळ, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी गव्हाचे पीठ घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे.
- पीठ मळताना साध्या पाण्याचा वापर न करता पूर्ण गरम पाणी वापरावे.
हेही वाचा >> चिकाच्या दुधाशिवाय बनवा मऊ जाळीदार खरवस; ही घ्या सोपी रेसिपी
- मळलेल्या पीठाचे लहान गोळे करुन ते प्लास्टीकच्या कागदावर तेल लावून हाताने थापावेत.
- गॅसवर कढईत तेल घालून ते चांगले तापू द्यावे आणि वडे त्यात लालसर होईपर्यंत चांगले खरपूस तळून घ्यावेत.