How To Make Poha Papad : पोळी-भाजी व वरण-भाता बरोबर लोणचं किंवा पापड असेल तर जेवणाची मजा द्विगुणित होते. पावसाळा, हिवाळा असो किंवा उन्हाळा जेवणाबरोबर तळलेला, भाजलेला, कुरकुरीत पापड खायला प्रत्येकालाच आवडतो. काही जण आवडतीने पापड भाजून डब्यात भरून ठेवतात आणि जेवताना त्यातील पापड खातात. तुम्ही आतापर्यंत उडीद, मूग, नाचणी, ज्वारी, तांदूळ आदी अनेक पापडांचे प्रकार खाल्ले असतील. तर आज आपण थोडं वेगळं म्हणजेच पोह्यांचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत.
साहित्य :
१. एक किलो जाडसर पोहे
२. हिंग किंवा हिंगपूड
३. पापडखार किंवा सोडा
४. लाल तिखट
५. अर्धा चमचे जिरे
६. पाणी
हेही वाचा…Rajma Usal: राजमाची रस्सेदार उसळ कधी खाल्ली आहे का? मग पौष्टीक पदार्थाची रेसिपी लगेच लिहून घ्या
कृती :
१. सर्वप्रथम पोहे चाळून घ्या. पोहे कुरकुरीत होईपर्यंत कढईत भाजून घ्या. गार झाल्यानंतर पोहे मिक्सरमध्ये बारीक करा आणि पीठ करून घ्या. एका भांड्यात हे मिश्रण घ्या. त्यात अर्धा चमचा हिंग किंवा हिंगपूड, अर्धा चमचा पापडखार किंवा सोडा, एक मोठा चमचा लाल तिखट, मीठ, अर्धा चमचा ठेचून घेतलेलं जिरे आदी पदार्थ घालून पीठ पाण्याने भिजवा.
२. नंतर पीठ चांगलं मळून घ्या.
३. त्यानंतर पापड लाटून घ्या.
४. जमिनीवर पेपर किंवा प्लास्टिक घाला आणि दोन उन्हात या पापडांना सुकायला ठेवा.
५. अशाप्रकारे तुमचे ‘पोह्याचे पापड’ तयार.
सुट्टीचा दिवस असो किंवा घरी पाहुणे येणार असो आपल्याकडे पोहे नक्कीच बनतात. पण, दरवेळी पोहे खाऊन आपल्यातील अनेकांना कंटाळा येतो. तर अशावेळी तुम्ही पोह्यांपासून पापड बनवा आणि जेवताना त्याचा आनंद घ्या . यासाठी वर सांगितल्याप्रमाणे काही मोजकंच साहित्य तुम्हाला लागेल. तसेच कृती देखील अगदी सोपी असल्यामुळे हे पापड तुम्ही घरच्याघरी सहज बनवू शकता. खिचडी, वरण भात किंवा नावडती भाजी असेल ; तर त्याच्याबरोबर तोंडी लावायला हे पापड तुम्ही नक्कीच खाऊ शकता.