रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट पोकळ्याची भाजी आणि देठी भाजी बनवू शकता. ही भाजी बनवणे अतिशय सोपे आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार पोकळ्याची भाजी आणि देठी रेसिपी कशी बनवायची.

पोकळ्याची भाजी आणि देठी साहित्य

एक पेंडी पोकळ्याची
एक मोठा कांदा
पाच सहा लसूण पाकळ्या
फोडणीचे साहित्य – तिखट, मीठ,हळद, मोहरी हींग हळद
एक मोठा चमचा दाण्याचे कुट
अर्धा चमचा साखर
दोन मिरचीचे तुकडे

पोकळ्याची भाजी आणि देठी कृती

प्रथम पोकळ्याची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेणे व नंतर चिरुन घेणे. ही भाजी फार बारीक चिरायची नाही. (शिजायला अत्यंत सोपी असल्याने काही ठिकाणीं ही भाजी न चिरता अख्खी पाने सुद्धा फोडणीला टाकतात)

कांदा चिरून लसूण बारीक तुकडे करून घ्यावा.नंतर पसरट तव्यात तेल घालून हींग मोहरीची फोडणी करून त्यात प्रथम लसूण थोडा परतून नंतर कांदा घालावा.

कांदा थोडा पारदर्शक झाला की चिरलेली भाजी घालावी. भाजी पाच सात मिनीटे नुसती हलवली की छान शिजते. यावर झाकण ठेवायची गरज नाही, शिजली की तिचा रंग बदलतो

या पोकळ्याच्या देठांचे चिरुन तुकडे करायचे. तुकडे सुद्धा फार बारीक नकोत मध्यम करायचे. पातेल्यात हे तुकडे बुडतील इतकेच पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचे.

परत पाच मिनिटे झाकण काढायचे नाही. शिजलेले तुकडे गार झाले की, एक चमचा दाण्याचे कुट, अर्धा चमचा साखर चवीपुरते मीठ घालायचे.

छोट्या कढल्यात मोहरी, हींग घालून फोडणी करायची दोन मिरचीचे तुकडे व किंचित हळद घालून ही फोडणी शिजलेल्या देठांच्य तुकड्यावर घालायची.

हेही वाचा >> कच्ची पपई खाल्याने आरोग्याला होतील चमत्कारी फायदे; कच्च्या पपईची भाजी गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा

बारीक चिरलेली कोथींबीर व दोन तीन चमचे दही घालून चांगलें कालवून घ्यायचे. अशाप्रकारे आपली पोकळ्याची भाजी आणि देठी तयार आहे.