pomfret fish fry : मासे केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही असतात. मासे पचण्यासही हलके असतात. आहारतज्ञही मटण-चिकनच्या तुलनेत मासे खाण्यास सांगतात. त्वचा आणि केसांची गुणवत्ताही मासे खाल्ल्यानं सुधारते. त्यात मांसाहारी लोकांचा पापलेट हा जिव्हाळ्याचा विषय आहे. आतापर्यंत तुम्ही अनेक वेळा घरी पापलेट बनवले असतील. मात्र, आम्ही तुमच्यासाठी आज पापलेटची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. हे भरलेलं पापलेट फ्राय बनवून तुमचा रविवार नक्की स्पेशल होईल. चला तर पाहुयात चटणीचे भरलेले पापलेट कसे बनवायचे.
चटणीचे भरलेले पापलेट साहित्य –
पापलेट छोटे ३, ओलं खोबरं अर्धी वाटी, लसूण ७-८ पाकळ्या, हळद एक चिमूट, हिरव्या मिरच्या ४, ताजी कोथिंबीर जुडी १, लवंग, साखऱ, एक वाटी पाणी, लिंबाचा रस एक मोठा चमचा, तांदळाचे पीठ २ मोठे चमचे, रवा २ मोठे चमचे, मीठ चवीनुसार.
चटणीचे भरलेले पापलेट कृती –
मासा स्वच्छ करुन भरण्यासाठी कापा, हळद आणि मिठात मुरु द्या. खोबरं खवून घ्या. लसूण हळद वाटा. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि खोबरे बारीक वाटून घ्या. लिंबाचा रस मिसळा. चटणीचे तीन समान भाग करा, कापलेल्या म्हणजेच चिरा पाडलेल्या पापलेटमध्ये चटणी भरा. उरलेली चटणी माशाच्या दोन्ही बाजूला लावा. फ्राइंग पॅनमध्ये तेल गरम करा, एका ताटलीत रवा आणि तांजळाचे पीठ एकत्र करा, माशाला दोन्ही बाजूंनी हे पीठ लावा, चटणीची बाजू वर येईल अशा प्रकारे मासा पॅनमध्ये ठेवा. एक बाजू शिजल्यावर तेल काढून टाकण्यासाठी पेपर नॅपकीनवर ठेवा.