Prawns Masala Recipe : बहुतांश मासेप्रेमींना कोळंबीपासून बनवले जाणारे विविध पदार्थ खायला खूप आवडतात. अगदी छोटासा असा हा कोळंबी मासा खूपच चविष्ट असतो. त्यामुळे कोळंबी हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतींनी बनवला जातो. कोळंबीचा रस्सा, कोळंबीचे कालवण, कोळंबी फ्राय, कोळंबी भात असे पदार्थ कोकणात तुम्हाला हमखास खायला मिळतील. दरम्यान, हॉटेल्समध्ये गेल्यावर तुम्हाला कोळंबीचे आणखी काही विशेष पदार्थ चाखायला मिळतील. त्यातीलच एक खास पदार्थ म्हणजे कोळंबी मसाला. बुधवारी जेवणात काही नॉनव्हेज बनवण्याचा बेत असेल, तर तुम्ही कोणतेही वाटण न वापरता अगदी १० मिनिटांत कोळंबी मसाला डिश बनवू शकता. चला तर मग आपण झणझणीत कोळंबी मसाला रेसिपी कशी बनवायची सविस्तर जाणून घेऊ…
कोळंबी मसाला बनवण्यासाठी साहित्य
१) कोळंबी- अर्धा किलो (व्यवस्थित स्वच्छ करून घ्या)
२) मीठ- चवीनुसार
३) लाल मसाला- दीड चमचा
४) हळद- दीड चमचा
५) कोकम आगळ किंवा लिंबाचा रस- १ टीस्पून
६) आले- १ इंच
७) लसूण- १५ ते २० पाकळ्या
८) कमी तिखट हिरव्या मिरच्या- ४
९) कोथिंबीर- गरजेनुसार
१०) तेल- ४ चमचे
११) कांदे- २ (मोठ्या आकाराचे)
१२) टोमॅटो- २
१३) गरम मसाला- १ टीस्पून
१४) धणे पावडर- १ टीस्पून
कोळंबी मसाला बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका भांड्यात व्यवस्थित साफ करून धुऊन घेतलेली कोळंबी घ्या. त्यानंतर त्यात थोडे मीठ, पाव चमचा हळद, तिखट मसाला, एक चमचा कोकम आगळ किंवा लिंबाचा रस टाका. आता आले, लसूण, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर यांची बारीक पेस्ट बनवून घ्या आणि ती यात टाका. त्यानंतर सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून ३० मिनिटे बाजूला ठेवून द्या; जेणेकरून सर्व गोष्टी त्यात व्यवस्थितरीत्या मुरतील.
हेही वाचा – मालवणी पद्धतीने बनवा मच्छीचा सार; ही घ्या वाटणाची सोपी रेसिपी…
दुसरीकडे कोळंबी मसाला बनवण्यासाठी एका कढईत तीन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा थोडा लालसर होईपर्यंत शिजवा. त्यानंतर त्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर यांची दोन चमचे पेस्ट मिक्स करा. पेस्टमधील कच्चेपणा कमी करण्यासाठी ती एक मिनीट कढईत ढवळत राहा. आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो मिक्स करा. त्यानंतर लगेचच मीठ टाका; जेणेकरून टोमॅटो पटकन शिजेल. आता कढईवर झाकण ठेवा आणि चार ते पाच मिनिटे हे मिश्रण गॅसच्या मध्यम आचेवर शिजवून घ्या. आता त्यात पाव टीस्पून हळद, एक टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, एक टीस्पून धणे पावडर टाका. हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळून मिक्स करा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत ढवळत राहा. त्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी मसाल्यात टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करा. त्यानंतर झाकण ठेवा आणि दोन मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे १० मिनिटे तुम्ही ही कोळंबी शिजवून घ्या; पण मधे मधे झाकण काढून ती परतत राहा. त्यानंतर एक प्लेटमध्ये शिजलेली कोळंबी काढा आणि त्यावर थोडी कोथिंबीर टाका. अशाप्रकारे तुमचा कोळंबी मसाला खाण्यासाठी एकदम तयार आहे. तुम्ही चपाती, भाकरी किंवा भाताबरोबरही हा कोळंबी मसाला खाऊ शकता.