सकाळी नाश्त्यासाठी काही पदार्थ हमखास ठरलेले असतात. जसं की, पोहे, उपमा, मेदूवडा, डोसा, शिरा, उत्तप्पा या पदार्थाशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. बाहेर फिरायला गेलो तरी एखाद्या हॉटेलात जाऊन अशा हेल्दी पण तरीही चटपटीत पदार्थावर आपण ताव मारतो. तर तुम्ही आजवर ओनियन उत्तप्पा, टोमॅटो उत्तप्पा, मसाला उत्तप्पा, म्हैसूर उत्तप्पा, पिझ्झा उत्तप्पा व व्हेजिटेबल उत्तप्पा असे उत्तप्प्याचे विविध प्रकार तुम्ही खाल्ले असतील. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यात रवा आणि पालकचा उत्तप्पा कसा बनवायचा हे दाखवण्यात आलं आहे. चला तर पाहुयात या अनोख्या पदार्थाची रेसिपी.
साहित्य :
- रवा
- पालक
- हिरवी मिरची
- आलं
- दही
- जिरेपूड, काळी मिरी पावडर, तिखट
- सिमला मिरची, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर
- मीठ आणि पाणी
कृती :
- मिक्सरमध्ये रवा, पालक, हिरवी मिरची, आलं, दही, थोडं पाणी आणि मग कोथिंबीर घालून हे सर्व पदार्थ बारीक करून घ्या.
- तयार झालेलं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या.
- मीठ, जिरेपूड, काळी मिरी पावडर, तिखट त्या मिश्रणात घाला आणि पुन्हा मिश्रण एकजीव करून घ्या.
- त्यानंतर तवा गॅसवर ठेवा. त्यात थोडं तेल घाला.
- तयार केलेलं मिश्रण पॅनवर चमच्याने टाका. मिश्रण वर्तुळाकार आकारात तुम्ही तव्यावर टाका.
- त्यानंतर वरून सिमला मिरची, टोमॅटो, गाजर, कोथिंबीरचे छोटे छोटे तुकडे घालून घ्या व वरून थोडं तेल सोडा.
- त्यानंतर थोडं शिजलं की परतवून घ्या.
- अशाप्रकारे तुमचे रवा आणि पालकचे पौष्टीक उत्तप्पा तयार.
व्हिडीओ नक्की बघा :
सोशल मीडियावर हा व्हिडीओ या @__homelykitchen इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.