Shevalachi Bhaji Recipe : पावसाळा सुरू होताच विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारात पाहायला मिळतात. ज्या आरोग्यासाठी एकदम पौष्टिक असतात. यात शेवळा ही रानभाजीदेखील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरीतील अनेक भागांत ही भाजी आवडीने खाल्ली जाते. वर्षातून एकदाच ही भाजी खाण्याचा आनंद घेता येतो. शेवळं दिसायला लांबट कोंबासारखी असतात. अनेक जण ही भाजी सुकटीत टाकून बनवतात. पण, काही ठिकाणी ती बनवण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण, आज आपण मटणासारखी चमचमीत शेवळाची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. चला तर मग पाहूया शेवळाची भाजी बनवण्याची रेसिपी…
शेवळ्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) ४ जुड्या शेवळा भाजी, १० ते १२ काकड
२) १ कांदा फोडणीसाठी
३) ५/६ कडीपत्त्याची पाने
४) ४ चमचे चिंचेचा कोळ
५) १ चमचा राई
६) १ चमचा जिरे
७) १/४ चमचा हिंग
८) दीड चमचा घरगुती लाल मसाला
९) अर्धा चमचा घरगुती गरम मसाला
१०) १ चमचा धणे पावडर
११) १ चमचा हळद
१२) छोटा गुळाचा खडा
१३) ६ चमचे तेल
१४) दीड कप पाणी
१५) चवीनुसार मीठ
वाटणासाठी लागणारे साहित्य
१) १ कांदा वाटणासाठी
२) ३ हिरव्या मिरच्या
३) १/४ कप भाजलेले सुके खोबरे
४) एक फोड आले
५) ४ ते ५ पाकळ्या लसूण
६) मूठभर कोथिंबीर
शेवळ्याची भाजी बनवण्याची कृती
सर्वप्रथम शेवळ्याची भाजी नीट साफ करून घ्यावी. साफ करताना हाताला तेल लावा, जेणेकरून भाजी साफ करताना खाज सुटणार नाही, शेवळाची भाजी साफ करताना सर्वप्रथम त्याच्या वरचं कव्हर आणि देठ काढून टाका. यानंतर आतील केशरी रंगाचा दिसणारा भाग खाजरा असतो, त्यामुळे त्याच्या थोड्या वरच्या भागापासून तोही कापून टाका. अशाप्रकारे साफ केलेली शेवळं गोल कापून घ्या. त्याचप्रमाणे काकड देखील धुवून त्यातील बी काढून बारीक चिरुन घ्या.
यानंतर भाजीत टाकण्यासाठी वाटण बनवून घ्या, यासाठी सर्वप्रथम एका कढईत थोडं तेल गरम करून मग त्यात कांदा आणि खोबरं लालसर होईपर्यंत भाजा, थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ते काढा. त्यात मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण टाका आणि मिक्सरमधून चांगले बारीक वाटून घ्या.
हिरव्या मिरच्या चिरल्यानंतर हाताची जळजळ होतेय? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, मिळेल आराम
पुन्हा गॅसवर कढई गरम करून त्यात शेवळ्याची भाजी बनवण्यासाठी तेल गरम करा, तेल चांगले गरम होताच त्यात राई, थोडं जिरं, कढीपत्ता याची फोडणी द्या. यानंतर कांदा टाकून मऊ होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात साहित्यात दिल्याप्रमाणे बाकीचे सर्व मसाले टाकून तेलात चांगले परता. आता मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण कढईतील मसाल्यात तेल सुटेपर्यंत चांगले मिक्स करा. आता त्यात चिरलेली शेवळाची भाजी मिक्स करून परतून घ्या. यानंतर त्यात चिंचेचा कोळ, गुळाचा खडा आणि चवीनुसार मीठ टाका. यानंतर थोडे पाणी टाकून १० मिनिटे मध्यम आचेवर ही भाजी चांगली शिजू द्या. जास्त पाणी टाकू नका, नाही तर भाजीची चव बदलते. १० मिनिटांनी ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा.
तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही सुके सोडे किंवा कोळंबीमध्येदेखील ही भाजी बनवू शकता, जी चवीला एकदम जबरदस्त होते. ही रेसिपी आपण Gharcha Swaad नावाच्या युट्यूब अकाउंटवरुन जाणून घेतली आहे.