How To Make Rajma Usal: राजमा हा तेलबियांचा प्रसिद्ध प्रकार आहे. ‘राजमा चावल’ याचे नाव आपण अनेकदा ऐकलं किंवा आवडीने खाल्ला सुद्धा असेल. राजमामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी राजमा खूप चांगला ठरतो असं म्हटलं जातं. तो रक्तातील शर्करेचं प्रमाण वाढू देत नाही. राजम्यामध्ये खूप प्रमाणात फायबर आढळते ; म्हणून राजमामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. तर म्हणूनच आज आपण राजम्याची एक खास रेसिपी पाहणार आहोत. याचे नाव आहे ‘राजमाची रस्सेदार उसळ’ चला तर पाहू या पदार्थाची साहित्य व कृती…

साहित्य :

१. दोन वाट्या राजमा
२. अर्धी वाटी चणाडाळ
३. आलं
४. दहा ते आठ लसूण पाकळ्या
५. अर्धी वाटी कांदा
६. एक चमचा गरम मसाला
७. अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
८. दोन चमचे भाजलेले तीळ
९. दोन चमचे भाजलेली खसखस
१०. बारीक कापून घेतलेला टोमॅटो – एक वाटी
११. दोन दालचिनी
१२. तीन ते चार लवंग
१३. एक वेलची
१४. दोन ते तीन तमालपत्र
१५. मीठ
१६. हळद
१७. लाल तिखट – अर्धा चमचा
१८. तेल

हेही वाचा…Manchurian Paratha: नाश्त्याला करा चविष्ट ‘मंच्युरियन पराठा’ ; पौष्टीक पदार्थ फक्त दहा मिनिटांत बनवा; रेसिपी लिहून घ्या

कृती :

१. दोन वाट्या राजमा रात्रभर भिजत ठेवा.
२. अर्धी वाटी चणाडाळ दोन ते तीन तास भिजत ठेवा.
३. त्यानंतर राजमाला हळद, मीठ, दोन चमचे तेल लावून घ्या आणि तासभर तसंच ठेवा आणि नंतर कुकरमध्ये शिजवून घ्या.
४. नंतर चणा डाळ सुद्धा मीठ घालून शिजवून घ्यावी व नंतर स्मॅश करून घ्यावी.
५. आलं, लसूण पाकळ्या, कांदा हे तिन्ही पदार्थ मिक्सरच्या भांड्यात एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्या.
६. कढईत अर्धी वाटी तेल घ्या. त्यात दालचिनी, लवंग, वेलची, तमालपत्र, आलं- लसूण घालून परतवून घ्या.
७. नंतर त्यात, टोमॅटो, सुखं खोबरं परतवून घ्या.
८. नंतर त्यात चणाडाळ, शिजवलेला राजमा मंद आचेवर परतवून घ्या.
९. मग हळद, मीठ, लाल तिखट, तीळ, खसखसचे वाटण घाला आणि चमच्याने हलवत रहा.
१०. नंतर त्यात गरम मसाला घालून, मिश्रण एकजीव करून घ्या आणि एक वाफ आणा.
११. अशाप्रकारे तुमची राजमा उसळ तयार.

तुम्ही ही रस्सादार राजमाची उसळ पोळी, भाकरी, ब्रेड किंवा भाताबरोबरही खाऊ शकता.

आरोग्यदायी फायदे :

राजमा हा उत्तर भारतीय पदार्थ मानला जातो. पण, त्यांची चव आणि त्यातील पौष्टिक पोषक घटकांमुळे ते इतर राज्यांमध्ये तितक्या आवडीने खाल्ले जातात. हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी राजमा फायदेशीर आहे.राजमातील उच्च फायबर सामग्री कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि पाचन आरोग्य सुधारण्यास मदत करते. तसेच ते रक्ताभिसरण प्रणालीच्या एकूण आरोग्यासाठी योगदान देते. अशा आरोग्यदायी फायद्यांनी भरपूर राजम्याची तुम्ही सुद्धा रस्सेदार उसळ नक्की बनवून पाहा.