Rasgulla Recipe In Marathi: पश्चिम बंगालचा पांढरा शुभ्र रसगुल्ला जगभरात प्रसिद्ध आहे. एरवी ज्यांना फार गोड खायला आवडत नाही ती मंडळी सुद्धा रसगुल्ला मात्र अनेकदा आवडीने खातात. तोंडात विरघळणारा रसगुल्ला फक्त बाजारातच मिळतो असा जर आपला समज असेल तर आज आपणच तो पूणर्पणे खोडून काढणार आहोत. लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत रसगुल्ल्याची मराठी भाषेतील अगदी सोप्पी रेसिपी. मोजून ५- ६ वस्तूंमध्ये तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मनसोक्त रसगुल्ला खाता येईल. चला तर मग वाट कसली पाहताय सुरु करूयात..
रसगुल्ला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१ लिटर दूध, एका लिंबाचा रस, अर्धा किलो साखर, २ चमचे (मोठे) रवा, वेलची पूड, आणि उपलब्धतेनुसार केशर
रसगुल्ला बनवण्याची कृती
मोठ्या टोपात १ लिटर दुध तापवायला ठेवा. उकळी फुटल्यावर यात लिंबाचा रस घाला. दूध फाटल्यावर त्यात ३ ते ४ कप थंड पाणी घालून गॅसची आच मंद करा. यामुळे छेना किंवा पनीर चांगले तयार होते. तुम्हाला फाटलेले दूध घट्ट झाल्याचे दिसल्यावर गॅस बंद करा व गाळणीतून दूध व पनीर वेगळे गाळून घ्या. यानंतर एका परातीत पनीर घेऊन त्यात रवा घालून मळून घ्या. यावेळी तयार मिश्रणाचे टेक्श्चर मऊ आणि मलईसारखे असुदे यात थोडी वेलची पूड टाकून हळू हळू मळून घ्या. पाणी घालू नका. नंतर याचे छोटे गोळे करून घ्या.
रसगुल्ल्याचा पाक रेसिपी
रसगुल्ल्याचा पाक तयार करण्यासाठी एका टोपात पाणी तापवायला ठेवा. त्यात अर्धा किलो साखर घालून विरघळू द्या. थोडी उकळी आल्यावर त्यात दूध घालून त्यावर आलेली मळी काढून टाका. यामुळे पाक चांगला पांढरा शुभ्र होईल. यात पनीरचे गोळे घालून उकळू द्या, हे गोळे तिप्पट आकाराचे होतात. मग गॅस बंद करा व गरमागरम रसगुल्ला सर्व्ह करा. जर आपल्याकडे केशर असेल तर या रसगुल्ल्यांवर केशर भिजवून ठेवलेल्या पाण्याचे थेंब घालून सजवू शकता.
हे ही वाचा<< बटरवर भाजलेली खमंग दाबेली घरीच बनवा; सारण व मसाला कसा तयार करायचा? पाहा रेसिपी
टीप: पनीर व रवा मळताना हाताला किंचित तूप लावल्यास छान फ्लेव्हर येतो. यात अन्य कोणतेही पीठ, पाणी किंवा साखर, मिल्क पावडर घालू नका.
हे ही वाचा<< पापलेट लोणचं चाखलंयत का? ‘या’ सोप्या रेसिपीने घरीच बनवा आचारी मच्छी टिक्का
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा!