कितीही कंट्रोल केलं तरी गोड पदार्थ पाहून आपल्यालाच राहवत नाही. तोंडावरचा ताबा सुटतो आणि मग नको नको करत गोड पदार्थांवर यथेच्छ ताव मारला जातो. त्यातही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची तर खूपच पंचाईत होते. म्हणूनच तर यावर्षी पारंपरिक पदार्थांना थोडा फाटा द्या आणि नव्या धाटणीचे कमी गोड असणारे पदार्थ करून पहा. आपल्याकडे अतिशय आवडीनं खाल्लं जाणारं शाही पक्वान्न म्हणजे श्रीखंड. अगदी थोडक्यात वर्णन करायचं तर पाणी काढलेल्या दह्यात साखर आणि वेलची, केशर वगैरे घालून केलेला पदार्थ म्हणजे श्रीखंड. तुम्ही आतापर्यंत अनेकदा श्रीखंड खाल्लं असेल पण कधी रताळ्याचं श्रीखंड खाल्लंय का ? चला तर मग याची रेसिपी पाहुया.
रताळ्याचं श्रीखंड साहित्य
२ लिटर गोड दही
३ रताळे
१५० ग्रॅम साखर
५-६ छोटी विलायची
२ टी स्पून पिस्त्याचे काप
२ टीस्पून बदामाचे काप
थोडी जायफळ
७-८ केशराच्या काड्या
रताळ्याचं श्रीखंड कृती
१. प्रथम दही एका कापडात पाच ते सहा तास बांधून ठेवा. पाच ते सहा तासानंतर त्याचा छान चक्का तयार होईल. आता रताळी उकडून घ्या. उकडलेल्या रताळ्याचे साल काढून घेऊन स्मॅशरने त्याचा लगदा तयार करून घ्या.
२. आता मिक्सर मधून साखर तसेच छोटी वेलची बारीक वाटून त्याची पिठीसाखर तयार करा. आता एका वाटीत तीन टीस्पून गरम दूध घेऊन त्यात केशर घालून घ्या.
३. आता मिक्सर अथवा फूड प्रोसेसरच्या भांड्यात रताळ्याचा लगदा, चक्का तसेच केशरंच दूध घालून दोन ते तीन मिनिटे मिक्सरमधून छान फेटून घ्या. आता श्रीखंड एका भांड्यात काढून त्यात पिठीसाखर, घालून छान मिक्स करून घ्या.
हेही वाचा >> झटपट नी पोटभरीचे गाजराचे मिल्कशेक; लहान मुलांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल
४. आता त्यात थोडी जायफळ किसून अथवा कुटून घाला. परत एकदा श्रीखंड एकत्रित करून घ्या. तयार श्रीखंड बदाम-पिस्ता ने गार्निश करा. अप्रतिम चवीचं रताळ्याचा श्रीखंड तयार आहे.