Ratalyache farali patties recipe in marathi: hi: अनेकदा उपवास असला की साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे अशा पद्धतीचे पदार्थ खाल्ले जातात. अनेकदा महिला उपवासाच्या विविध रेसिपी ट्राय करत असतात. पण नेहमीच त्या रेसिपींना यश मिळेल असं नाही. तुम्हालाही जर या साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आपण रताळ्याचे फराळी पॅटीस कसे बनवायचे ते जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया यासाठी लागणारं साहित्य…

साहित्य

  • 4 मोठे रताळे उकडून
  • 2 बटाटे उकडून
  • 3 चमचे साबुदाणा पिठ (जाडसर)
  • 2 चमचे शिंगाडा पिठ
  • 2 चमचे राजगिरा पिठ
  • 1 कप ओले नारळ खोवुन
  • तीन-चार हिरव्या मिरच्या
  • 1 आल्याचा तुकडा
  • 1 चमचा जीरे
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • 3 चमचे दाण्याचा कुट
  • 1 लिंबाचा रस
  • 1/2 चमचा साखर
  • शेंगदाणा तेल आवश्यकतेनुसार

कृती

प्रथम रताळी, बटाटे उकडून छान मॅश करुन घ्या. त्यामधे शिंगाडा, राजगिरा व एक चमचा साबुदाणा पिठ घाला,(बाईंडींगसाठी)चवीनुसार मीठ घालून गोळा करुन घ्या..

आता खोवलेल्या नारळात मिरच्या, जीरे, आले घालून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यात मीठ,साखर,लिंबाचा रस घाला. शेंगदाणे कूट घाला आणि सारण करून घ्या.

आता हाताला तेल लावून रताळ्याच्या गोळ्याची पारी करुन त्यात हे सारण भरुन पारी बंद करा. गोलाकार आकार द्या व हे पॅटीस साबुदाणा पिठात घोळवबन घ्या. सगळे पॅटीस असेच करुन घ्या.

कढईत तेल गरम करुन हे सर्व पॅटीस मिडीयम फ्लेमवर डिप फ्राय करुन घ्या.

मस्त गरम गरम रताळ्याचे फराळी पॅटीस खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा…