परदेशी पक्वान्न : नीलेश लिमये

साहित्य – अर्धा किलो मटन खिमा, ४ मोठे बटाटे, १ चमचा ऑलिव्ह ऑइल, ३चमचे  बटर, २ कांदे बारीक चिरून, १ गाजर किसून, ५० ग्रॅम बारीक चिरलेली सेलेरी, ५० ग्रॅम फ्रेश थाईम, ४ ते ५ लसूण पाकळ्या बारीक चिरून, १ चमचा शहाजिरे, २ चमचे मैदा, अर्धा कप रेड वाइन, अर्धा कप चिकन स्टॉक, पाऊण कप क्रीम, पाव कप बारीक चिरलेली कांदापात, एका अंडय़ाचा बलक, ५० ग्रॅम किसलेले चीज, बारीक चिरलेली पार्सली.

कृती

प्रथम एका भांडय़ात बटाटे उकडून घ्यावेत. उकडताना त्यात थोडे मीठ घालावे आणि १५ मिनिटे छान शिजू द्यावे. या दरम्यान दुसऱ्या एका भांडय़ात तेल गरम करून त्यात एक चमचा बटर घालावे. बटर वितळल्यावर त्यात मटण खिमा घालून परतावे. ५ ते १० मिनिटे परतत राहावे. थोडे शिजत आले की त्यात मीठ आणि मिरपूड घालून परतावे. खिमा ब्राऊन रंग यईस्तोवर परतावे. त्यात कांदा, गाजर, सेलरी, थाईम, लसूण, भरडलेले शहाजिरे आणि जिरे घालून ८ मिनिटे शिजू द्यावे. त्यात मैदा घालून परतावे. वाईन आणि चिकन स्टॉक घालून दाट होईपर्यंत ढवळत राहावे. मंद आचेवर शिजू द्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये २ चमचे बटर घेऊन त्यात कुस्करलेले बटाटे घालावेत. ते परतल्यानंतर क्रीम, मिरपूड, अंडय़ाचा बलक घालून परतावे. नंतर हे मिश्रण गॅसवरून खाली उतरवावे. आता मटण खिमा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घ्यावा. त्यावर बटाटय़ाचे हे मिश्रण पसरावे. त्यावर किसलेले चीज पसरावे. जर तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर त्यामध्ये हे मिश्रण घालून आपण केकला जसे आयसिंग करतो, त्याप्रमाणे आपल्या आवडीनुसार डेकोरेट करावं. ही डीश ४ ते ५ मिनिटे ओव्हनमध्ये शिजवावी.

nilesh@chefneel.com