Kanda Bhaji Without Besan, Marathi Recipe: कांद्याविषयी एक गोष्ट तुम्ही ऐकली किंवा अनुभवली आहे का, तुम्ही ज्या पद्धतीने कांदा चिरता किंवा पदार्थात वापरता यानुसार त्याची चव बदलत असते. बारीक चिरलेला कांदा, उभे पातळ काप केलेला कांदा, जाड तुकडे केलेला कांदा, पेस्ट केलेला कांदा ते नुसते कांद्याचे गोलाकार रिंग्स, प्रत्येक स्वरूपात कांद्याची चव वेगवेगळी लागत असते. आजवर ही गोष्ट लक्षात आली नसेल तर पुढच्या वेळी चव घेताना नक्की असा एकदा विचार करा. तर मुद्दा असा की समजा, या छान पावसाळी वातावरणात तुम्ही कांद्याची भजी करत असाल तर नेहमीपेक्षा वेगळा ट्विस्ट देऊन कशी रेसिपी बदलता येईल हे आज आपण पाहणार आहोत. कांदा चिरताना केलेली ही छोटीशी ट्रिक तुमच्या भजीला छान कुरकुरीत चव देऊ शकते. शिवाय आजच्या या रेसिपीमध्ये आपण बेसन वापरणे टाळणार आहोत. तुम्हालाही प्रश्न पडला असेल ना भजीचा मेन भाग म्हणजे बेसन असताना आपण बेसनाशिवाय भजी करायची तरी कशी? तर वेगळ्या पीठांचं कॉम्बिनेशन करून आज आपण ही रेसिपी ट्राय करूया, चला तर मग..
बेसनाशिवाय कशी बनवाल कांदा भजी
साहित्य
- कांदे
- एक/ दोन कप तांदळाचं पीठ/ मुग डाळीचं पीठ,
- लाल तिखट
- चाट मसाला
- आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट.
- जीरा पावडर
- चिरलेली कोथिंबीर
- चवीनुसार मीठ
- दोन चमचे पाणी
कृती
आपण कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी करणार आहोत. ते सुद्धा बेसन न वापरता. खेकडा भजी म्हणजे नावावर जाऊ नका, शुद्ध शाकाहारी अशी ही रेसिपी आहे. कांदा घेतानाच आपण गोलसर आकाराचा कांदा निवडा. कांदे चिरून घ्या. चिरताना एक सोपा बदल आपल्याला करायचा आहे तो म्हणजे कांदा उभा पकडायच्या ऐवजी आपल्याला आडवा धरायचा आहे. यामुळे कांद्याचे काप लांब व बारीक होतील आणि भजीला छान कुरकुरीतपणा येईल.
आता आपल्याला कांद्यामध्ये नेहमीप्रमाणे मीठ घालून काही मिनिटे बाजूला ठेवायचे आहे. यामुळे कांद्याला पाणी सुटण्याची सुरुवात होते व तुम्हाला पीठ मळताना त्यात पाणी टाकायची गरज उरत नाही.
आता आपल्याला बेसनाच्या ऐवजी भिजवलेल्या मूग डाळीची बारीक वाटलेली पेस्ट घालायची आहे. वाटल्यास आपण मूग डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता. भजीला कुरकुरीतपणा यावा आणि भजी जास्त तेल शोषून घेऊ नये यासाठी आपण या पिठात तांदळाचं पीठ घालू शकता.
या पिठात एक ते दोन चमचे लाल तिखट, एक चमचा चाट मसाला, एक चमचे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, एक ते दोन चमचे जीरा पावडर, एक ते दोन कप चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून एकत्र हे पीठ थोडं घट्टसर असं मिसळून घ्या.
हे ही वाचा<< ५ मिनिटांत बनवा शेवग्याच्या पानांची ठेचा चटणी, डॉक्टरांनी सांगितलं डोळे, त्वचा व वजन नियंत्रणासाठी कशी होईल मदत?
तुमच्याकडील पिठाचा अंदाज घेऊन मग कढईत तेल घ्या. तेल खूप जास्त तापवू देऊ नका. तेल जास्त तापल्यास भजी करपतात आणि मग आतून कच्च्या राहतात. तेल एकदा तापले की मग, गॅसची आच मंद करा व भजी तळून घ्या.