गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस ‘ऋषिपंचमी’ या वर्षी २० सप्टेंबरला ऋषिपंचमी साजरी केली जाणार आहे. ऋषिपंचमी या दिवसाची ओळख म्हणजे या दिवशी केली जाणारी एक वैशिष्ट्यपूर्ण भाजी. याला ऋषीची भाजी असेही म्हणतात.पूर्वी सर्व भाज्या, या शेतावरील बांधावर उगवलेल्या किंवा घरामागील परसबागेत लागवड केली जात होती. मात्र, शहरीकरणाच्या ओघात घरासमोरील अंगण नाहीसे झाल्यामुळे महिलांना २१ प्रकारच्या भाज्या गोळा करण्यासाठी दिवस अपुरे पडू लागले आहेत.ऋषिपंचमीच्या व्रतासाठी अळूची पाने, सुरण, भेंडी, लाल भोपळा, कोवळा, माठ अशा २१ प्रकारच्या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते. चला तर मग पाहुयात कशी करायची गणेशोत्सव स्पेशल ‘ऋषींची भाजी’
साहित्य:
- १ कप अळूची पाने, चिरलेली
- १ कप अळूचे देठ, सोललेली आणि चिरलेली
- १ कप लाल माठ
- १ कप चिरलेला दुधीभोपळा
- १ कप चिरलेले रताळे
- १ कप सोललेली आणि चिरलेली कच्ची केळी
- १/२ कप हिरवे वाटाणे
- १/२ कप मक्याचे दाणे
- २ कप लाल भोपळा
- २ चमचे शेंगदाणे
- एक लिंबू आकाराचा चिंचेचा गोळा
- १/२ कप किसलेले ताजे खोबरे
- ३ हिरव्या मिरच्या
- गुळाचा छोटा तुकडा
- चमचे तेल
- चवीनुसार मीठ
कृती:
- शेंगदाणे कमीत कमी २ तास भिजत ठेवा. चिंच १/२ कप पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा.
- चिंच मॅश करून पिळून घ्या आणि चिंचेचा कोळ तयार करून घ्या. कढई गरम करून तेल घाला.
- चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्या. सोललेली आणि चिरलेले अळूचे देठ घालून परतून घ्या.
- अळूची पाने, लाल माठ, चिरलेला दुधीभोपळा, रताळे, कच्ची केळी, भोपळा, हिरवे वाटाणे, शेंगदाणे,मक्याचे दाणे, घालून चांगले मिक्स करून घ्या.
- चिंचेचा कोळ, किसलेले खोबरे, मीठ आणि १ कप पाणी घाला. सगळ्यात शेवटी गूळ घाला.
- छान ढवळा आणि झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे शिजवा.
- सर्व भाज्या शिजल्या की बाजरीची भाकरी, ज्वारी भाकरी, तांदळाची भाकरी किंवा चपाती बरोबर गरमागरम सर्व्ह करा.
हेही वाचा >> Ganesh chaturthi 2023: बाप्पाच्या प्रसादाला वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी; सोपी रेसिपी लगेच नोट करा
टीप:
या डिशमध्ये भेंडी, अळूचे कंद आणि अंबाडीच्या पाने यासारख्या भाज्यांचा देखील समावेश केला जाऊ शकतो. जर तुम्ही अंबाडीची पाने वापरत असाल तर चिंचेचा कोळ वगळा कारण अंबाडीची पाने ही चवीला आंबट असतात.
अशाप्रकारे ही ऋषिपंचमीला बखस बनवली जाणारी, अनेक गुणांनी समृद्ध असणारी आणि पौष्टिक भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा. याची चव तुम्हाला निश्चितच आवडेल.