Sankashti Chaturthi Special Recipe: प्रत्येक गणेशभक्तासाठी संकष्टी चतुर्थी हा दिवस खूप खास असतो. साधारणपणे हिंदू दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या दिवशी संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी असते. अशा प्रकारे एका वर्षात १२ वेळा संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. अधिक मास असल्यास याची संख्या १३ होते. या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात. पुढे देवळात जाऊन किंवा घरी गणरायाची पूजा करुन उपवास सोडतात. या निमित्ताने घरच्या जेवणामध्ये ठराविक पदार्थ प्रामुख्याने खाल्ले जातात. त्यात कडव्या वालाच्या बिरड्याचा समावेश असतो. पण कधीकधी बिरडे खाऊन कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही कडव्या वालाची खिचडी बनवू शकता. या आगळ्यावेगळ्या पण पौष्टिक पदार्थाची सोपी रेसिपी आज तुमच्यासाठी लोकसत्ता पूर्णब्रह्म अंकातून घेऊन आलो आहोत .
साहित्य :
- तांदूळ १ पेला
- वाल अर्धा पेला मोड आणून सोललेले
- बिरड्याचे वाटण २ चमचे
- हिरवे वाटण अर्धा चमचा
- हळद अर्धा चमचा
- तिखट १ चमचा
- मीठ चवीप्रमाणे
- साखर अर्धा चमचा
- नारळाचे घट्ट दूध १ वाटी
- तळलेला मसाला २-३ चमचे
- कांदा १ बारीक चिरलेला
- तेल पाव वाटी
- तमालपत्र १
- साजूक तूप १-२ चमचे
- ओले खोबरे आणि कोथिंबीर सजावटीसाठी
कृती :
- प्रथम तांदूळ धुवून त्याला हळद, तिखट, मीठ, साखर, तळलेला मसाला आणि हिरवे वाटण चोळून ठेवा.
- कढईत तेल गरम करा. पुढे त्यात हिंग आणि तमालपत्र टाका, त्यावर कांदा टाकून नीट परतून घ्या.
- कांदा गुलाबी झाल्यावर त्याच्यावर वाल टाका आणि बिरड्याचे वाटण टाकून नीट परतून घ्या.
- तेल सुटल्यावर त्याच्यावर तांदूळ टाका आणि नीट परता. त्यावर दीड पेला गरम पाणी टाका.
- उकळी आल्यावर झाकण ठेवून त्याला वाफ आणा.
- नंतर नारळाचे दूध घालून झाकण ठेवून चांगली वाफ आणा. वरून १ चमचा साजूक तूप घाला.
- ५ मिनिटे झाकण ठेवा. गॅसबंद करून वाफ खिचडीत मुरू द्या.
- वाढताना वरून खोबरे आणि कोथिंबीर घाला.
आणखी वाचा – आमरस काळा पडू नये यासाठी ‘या’ ट्रिक्सची घ्या मदत; आंब्याचा सीझन संपल्यावरही खा रसाळ आमरस
कडव्या वालाच्या खिचडीला काहीजण डाळिंबी भात असेही म्हणतात. वालाऐवजी मसूर वापरून मसुराची खिचडीदेखील करता येते.