Sunday Special Non Veg Dish: पश्चिम महाराष्ट्र म्हणजे काळी माती , हिरवे वावर , दूध दुभते , ताजा गुळ , रांगडी माणसे आणि तेवढेच रंगतदार जेवण. आपल्याकडे रविवार आणि नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश घरांमध्ये असतं. सुट्टीच्या दिवशी घरच्यांसह चमचमीत नॉन व्हेज खाण्याची मज्जाच काही और असते. शनिवारी रात्री उद्या जेवणामध्ये काय बनणार हे ठरत असते. त्याशिवाय सकाळी उठून बाजारातून चिकन/ मटण कोण आणणार ही ड्युटी सुद्धा लागते. रविवारच्या दुपारी मस्त जेवण करुन घरातल्या लोकांबरोबर गप्पा मारल्याने आठवड्याचा थकवा नाहीसा होतो. पण काही वेळेस रविवारी जेवणात काय बनवू असा प्रश्न घरात्या गृहिणीला पडतो. तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर स्पेशल झणझणीत डीश मटण ताबंडा रस्सा बनवू शकता..
मटण फोडणी चे साहित्य
- १ मोठा कांदा
- १/२ टेबलस्पून हळद
- १ टेबलस्पून मीठ
- १/२ किलो मटण
- १ आणि १/२ टेबलस्पून तेल
- ताबंडा रस्सा बनवण्याचे साहित्य
- १/२ वाटी सुके खोबरे
- १५-२० लसूण पाकळ्या
- १ इंच आले
- १ टेबलस्पून जिरे
- १ आणि १/२ टेबलस्पून धने
- १ टेबलस्पून पाढंरे तिळ
- १ टेबलस्पून खसखस
- १ कांदा
- १ मसाला वेलची
- १ दालचिनी तुकडा
- १ चक्रीफूल
- २ हिरवी वेलची
- ४ लवंगा
- २-३ टेबलस्पून तेल
- ४ टेबलस्पून कांदालसूण मसाला
मटण ताबंडा रस्सा कृती
स्टेप १
मटण स्वच्छ धूवून घ्यावे आणि त्यात हळद मीठ घालून घ्यावे व चोळून ठेवावे. पातेल्यात एक टेबलस्पून तेल घालून बारीक चिरलेला एक कांदा घालून परतवावे.
स्टेप २
कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यात मटण घालून चांगले हलवावे व झाकण ठेवून शिजू द्यावे. वरती ताट झाकून त्या ताटात पाणी ओतावे. मीठ घातल्याने पाणी सुटते. दहा मिनिटे ठेवावे नंतर ताटातले पाणी गरम झालेले ते पातेल्यात ओतावे व पुन्हा ताटात नवे पाणी घालावे. असे किमान दोन तीन वेळा करावे. नंतर मटण हाताने तोडून पहा.
स्टेप ३
आता मसाला बनवण्याकरिता खोबरे काप करून भाजून घ्या सर्व मसाले म्हणजे जीरे,धने,तीळ,खसखस खडा मसाला सर्व भाजून घ्या आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे
स्टेप ४
पाणी घालून वाटन एकदम बारिक वाटावे. आता मटण आणि आळणी रस्सा बाजूला काढून घ्यावे. आळणी सूप लहान मुलांना तसेच मोठ्याना ही प्यायला दिला जातो.
स्टेप ५
आता पातेल्यात दोन तीन टेबलस्पून तेल ओतावे तेल तापले की त्यात तयार मसाला घालून परतवावे नंतर त्यात कांदालसूण मसाला घालून परतवावे. तेल बाजूने सुटेपर्यंत हलवावे.
स्टेप ६
तेल सुटू लागले की त्यात आळणी सूप आणि मटनाचे पिस घालून घ्यावे.
हेही वाचा >> एकाच चवीचं मटण खाऊन कंटाळलात? मग रविवारी बनवा झणझणीत ‘बंगाली स्पेशल मटण करी’, ही घ्या रेसिपी
स्टेप ७
मसाला गरम असल्याने रस्सा बनवण्याचे पाणी गरमच घालावे. आणि छान उकळू द्यावे. आता चवीनुसार मीठ घालून घ्यावे व किमान दहा मिनिटे उकळावे. सर्वात शेवटी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. भाकरी सोबत रस्सा छान लागतो.लिंबू पिळून एक एक घोट प्यायला मजा येते.