नवरात्रोत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. यानिमित्त अनेकजण देवीची मनोभावे पूजा करत अनेकजण ९ दिवस उपवास करतात. यात काहीजण निर्जळी तर काहीजण उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास करतात. प्रत्येकजण यापरीने उपवासाचे नियम पाळतात. यात पोटाला आराम देण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी उपवास करतात. यानिमित्त आम्ही तुम्हाला उपवासासाठी एक पौष्टिक पदार्थ सांगणार आहोत. जो चविष्ट तर आहेच पण ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखेही वाटेल. आज आपण उपवासासाठी राजगिऱ्याच्या पीठापासून थालीपीठ कसे बनवायचे पाहणार आहोत. चला तर मग जाणून घ्या रेसिपी…
राजगिऱ्याचे थालीपीठ बनवण्याचे साहित्य आणि कृती
साहित्य
१) २ वाटी राजगिऱ्याचं पीठ
२) दोन बटाटे
३) पाच हिरव्या मिरच्या
४) अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट
५) एक चमचा आल्याची पेस्ट
६) पाव वाटी कोथिंबीर
७) साखर
८) मीठ
कृती
सर्वप्रथम एका प्लेटमध्ये दोन वाटी राजगिऱ्याचं पीठ घ्या, त्यामध्ये सोलून जाड किसून घेतलेले दोन बटाटे टाका. मग त्यामध्ये पाव वाटी कोंथिबीर, अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट, पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, एक चमचा आल्याची पेस्ट टाका. आता पाच ते सहा चमचे साखर आणि चवीनुसार मीठ असे सर्व राजगिऱ्याच्या पिठात मिक्स करा. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर थोड पाणी घालून हे सर्व मिश्रण चांगल्याप्रकारे घट्ट मळून घ्या. मग तुम्ही थालीपीठचा गोळा पोलपाट किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवी थापून घ्या. तुम्हाला ज्या पद्धतीने थापता येईल त्या पद्धतीने थालीपीठ थापायचं. मग थालीपीठ तव्यावर गरम तेलात मस्त भाजून घ्या. अशा प्रकारे तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेतल्यानंतर खाण्यासाठी थालीपीठ तयार होतील.