– शेफ यशोधन देशमुख
नुकताच आषाढ संपल्यामुळे आता सगळ्यांनाच श्रावणाचे आणि पर्यायाने डाएटचेही वेध लागतात आणि हे लोण आता इतकं पसरलंय की, व्रत-वैकल्यांचा, उपवासांचा श्रावण महिना हा ‘राष्ट्रीय डाएट महिना’ घोषित करायला हरकत नाही. कारण याच काळात अचानक वाढलेल्या वजनाची जाणीव होऊन लवकरच येऊ घातलेल्या गणपती, दिवाळी, मग ख्रिसमस आणि घरातील इतर शुभकार्यांच्या निमित्ताने काढल्या जाणाऱ्या फोटोंमध्ये फिट अन सुदंर दिसण्यासाठी वजन कमी करण्याच्या मागे धावणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, आणि मग सुरु होतो वजन कमी करण्याचा एक खडतर प्रवास ! हा खडतर प्रवास आनंददायी होऊ शकतो का? हा सर्वांना भेडसावणारा खरा महत्वाचा प्रश्न आहे.
खरं तर श्रावण महिन्याची सुरुवात म्हणजे निसर्गात होणा-या आल्हाददायक बदलाची चाहूल! श्रावण म्हणजे शाकाहार, श्रावण म्हणजे सात्विक आहार आणि श्रावण म्हणजे व्रतवैकल्याचे वार… पण आता या पारंपरिक ओळखीच्या पलीकडे जाऊन श्रावण म्हणजे नियोजित आहार, श्रावण म्हणजे निरोगी जीवनशैलीची सुरुवात आणि श्रावण म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेली विविध जीवनसत्वं मुबलक प्रमाणात मिळवण्याचा काळ म्हणून आपण श्रावण महिन्याकडे नव्या दृष्टीने बघायला हवं. तसं सर्वांना पाहता यावं आणि त्याद्वारे स्वताच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणता यावेत, यासाठी श्रावणात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून बनवता येणाऱ्या सहज सोप्या डाएट रेसिपीज आणि निरोगी जीवनशैलीची गुपितं येत्या काही दिवसांत समजून घेणार आहोत.
डाएट म्हटलं कि उकडलेल्या भाज्या, सुप्स आणि सलाडच नेहमी आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण फक्त उकडलेल्या भाज्या, सुप्स आणि सलाड खाल्ल्याने काही वजन कमी होत नाही. त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे समाधान. आपण काहीही खातो तेव्हा भूक जेवढी महत्वाची आहे तेवढंच महत्व तो पदार्थ खाऊन मिळणारा आनंद आणि समाधान यांनाही आहे, कारण ह्या सगळ्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर चांगला आणि वाईट असे परिणाम होत असतात. त्यामुळे आपण काय खातोय हे जेवढं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं ते कसे आणि किती खातोय, हेसुद्धा महत्वाचं आहे. हे सर्व स्टेप बाय स्टेप समजून घेण्याची आणि नव्या आहारपद्धतीचा तसंच नव्या जीवनशैलीचा प्रवास सुरू करण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे श्रावण. श्रावणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या आणि फळे यांचा वापर करून आपण अतिशय रुचकर डाएट रेसिपीज घरच्या घरी कशा बनवता येतील, याची सुरुवात आजपासूनच करणार आहोत. चला तर मग शुभारंभ करूया, शरीरात साचलेले विषारी धातू आणि अनावश्यक घटकांच्या उत्सर्जनापासून म्हणजेच डीटाॅक्सपासून. आजच्या रेसिपीचं नाव आहे, ग्रीन डीटाॅक्स. बनवायला अत्यंत सोपी, पण तितकीच बहुगुणी. तिला पाणीपुरीचं पाणी म्हणायलाही हरकत नाही. पण एक लक्षात घ्या की, या ग्रीन डीटाॅक्ससोबत खाल्लेल्या अन्नाचे योग्य पचन तर होतेच, शिवाय पित्ताचा त्रासही कमी होण्यास मदत होते
रेसिपीचं नाव- ग्रीन डीटाॅक्स
साहित्य – १ वाटी कोथिंबीर, १० पुदिन्याची पाने, ८ तुळशीची पाने, १ विड्याचे पान, १/२ इंच आले, १/४ चमचा काळी मिरी पूड, चवीनुसार मीठ, १ लिंबाचा रस, १ ग्लास पाणी
कृती : मिक्सरच्या भांड्यामध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून २ मिनिटे व्यवस्थित ब्लेंड करावे. हवं असल्यास थंड करून सर्व्ह करावं.