इडली. डोसा, मेदूवडा, उत्तपा हे साऊथ इंडियन पदार्थ असले तरी संपूर्ण भारतात आवडीने खाल्ले जातात. मुंबईसह अनेक शहरांमध्ये याचे छोटे-मोठे स्टॉल्स दिसतात. यात इडली हा पदार्थ अनेक जण चवीने खातात. पण जर घरी इडली बनवण्याचा बेत आखायचा असेल तर तो नेहमी विकेंडच्यावेळीच होतो. कारण इडली बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ भिजत ठेवण्यासोबत अनेक गोष्टी कराव्या लागतात. यात खूप वेळही जातो आणि कष्टही लागतात. मात्र आज आम्ही तुम्हाला लोकसत्ताच्या पूर्णब्रह्म या अंकातून इडचीचे असे दोन प्रकार सांगणार आहोत, जे बनवण्यात तुमचा वेळही जाणार नाही आणि खाऊनं पोटही भरेल. आपण आज इन्स्टंट इडली आणि इन्स्टंट रवा इडली कशी बनवायची हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे :

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य

तीन वाटी रवा, एक वाटी दही, पाऊण चमचा फ्रूटसॉल्ट, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचा किसलेलं आलं, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल किंवा तूप, मोहरी, हिंग, कढीपत्ता, प्रत्येक अर्धा चमचा जाड कुटलेली मिरी आणि सुकी मिरची, खायचा सोडा.

इन्स्टंट इडली बनवण्याची कृती :

दह्यात अर्धा वाटी पाणी घालून आधी घुसळून घ्या, त्यात आलं. मीठ, रवा आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून चांगलं भिजवून घ्या. आता त्यात फ्रूटसॉल्ट घालून सर्व चांगले फेसवून घ्या आणि मिनी इडलीचा साचा वापरून इडल्या तयार करून घ्या. यानंतर नॉनस्टीक पॅनमध्ये तेल तापवून फोडणीचे साहित्य घाला आणि त्यावर इडल्या झटपट परतून घ्या. गरम, गार कशाही या इडल्या चांगल्या लागतात. यासोबत तुम्ही मिरच्या- कोथिंबिरीची दह्यात कालवलेली चटणी खाऊ शकता.

वरील साहित्यांचाच वापर करून तुम्ही घरच्या घरी इन्स्टंट रवा इडली सुद्धा बनवू शकता. इन्स्टंट रवा इडली बनवण्यासाठी कृती खालीलप्रमाणे

मिरची, आले आणि कढीपत्त्यांची पाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. यानंतर रव्यात हे वाटन मिक्स करून त्यात दही, तूप, मीठ, कोथिंबीर आणि खायचा सोडा घालून त्याचे थलथलीत पीठ बनवून घ्या. आता इडलीचा साच्याला तेल लावून त्यात पीठ घाला. यानंतर पंधरा मिनिटं इडलीचं भांड्यात हे वाफवून घ्या. अशाप्रकारे तयार झाली तुमची इन्स्टंट रवा इडली. या इडलीसोबत तुम्हा वेगळी चटणीची गरज नाही, पण चवीसाठी म्हणून तुम्ही चायनिज चटणी किंवा तिखट सॉससोबत देखील ही इडली खाऊ शकता.

हे इडलीचे दोन प्रकार बनवायला तर सोप्पे आहेत, त्यामुळे केवळ विकेंडलाच नाही तर जेव्हा कधी तुमची इडली खायची इच्छा होईल तेव्हा बनवून त्या खाऊ शकता. ही रेसिपी वाचून घरच्या घरी तुम्हीही एकदा इन्स्टंट इडली आणि इन्स्टंट रवा इडली बनवा आणि कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा.


मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soft spongy instant idli and rava idli recipes for breakfast how to make idli sjr