नीलेश लिमये
हा पदार्थ थोडाफार आपल्या जिलबीसारखा आहे. माझ्या साऱ्या खाद्यमुशाफिरीत मला एक लक्षात आलं आहे की, जगाच्या पाठीवर जवळपास सगळीकडेच काही चवी किंवा प्रकार कायम असतात. फक्त त्या करण्याच्या पद्धती बदलतात, त्यांचे आकारउकार बदलतात. उदा. डोसे, पॅनकेक, क्रेप्स हे एकमेकांचे खाद्यभाऊच आहेत की! शिवाय आपले मोदक आणि मोमो नाही का? शेवया आणि नूडल्स यांचं कूळ एकच की! अस्सल खाद्यप्रेमीला हे असे धागेदोरे सहज सापडतात. तर आता आजचा हा खास पदार्थ.
साहित्य
* २ वाटय़ा मैदा, ४ चमचे गुळाची पूड, १ चमचा मीठ, पाव चमचा दालचिनी पूड, १ चमचा पिठीसाखर, २ वाटय़ा दूध, १ चमचा बेकिंग पावडर, १ अंडे (आवडीनुसार). तेल.
कृती
एका भांडय़ात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ चाळून घ्या. त्यात गुळाची पूड मिसळा. दूध आणि अंडे फेटून ते या मिश्रणात ओता. आता हे मिश्रण १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्या. एका कढईत तेल गरम करा. गार झालेल्या मिश्रणाची जिलब्यांसारखी कडी करून तळायची आहेत पण ती हाताने तर वळता येणार नाहीत. मग कापडात पुरचुंडी करा, प्लॅस्टिकच्या पिशवीचा कोन करून घ्या, नाहीतर मग निमुळत्या तोंडाच्या बाटलीत भरून त्याने या जिलब्या तेलात सोडा. चांगल्या कुरकुरीत तळायला हव्यात. या जिलब्यांवर दालचिनी पूड आणि पिठीसाखर शिंपडायची आहे. त्यासाठी दालचिनी पूड आणि पिठीसाखर एकत्र करून ठेवा आणि जिलब्या तळून काढल्यानंतर त्यावर हे मिश्रण पेरा. या परदेशी जिलब्या अर्थात फनेल केक खायला मस्त लागतील शिवाय आपल्या जिलबीची आठवण करून देतील, ते वेगळंच!