शुभा प्रभू-साटम
कुरम्याचा अस्सल देशी अवतार शिवाय करायला सोपा. चव एकदम मांसाहारी रश्शासारखी आणि भाज्यासुद्धा अस्सल देशी
साहित्य
कोनफळ (जांभळा कंद, तो नसल्यास सुरण), बटाटा आवडीप्रमाणे, कारली छोटी हवीत, फणसाच्या सुक्या आठळ्या असायलाच हव्यात, चवळीच्या मोठय़ा शेंगा अथवा नसल्यास फरसबी, कोहळा या सर्व भाज्या जशा आवडतात त्या त्या प्रमाणात घेऊन, धुऊन, सोलून, मध्यम तुकडे करून २ वाटय़ा मोठय़ा. गावाकडे वटांब्यांची सोले वापरतात अथवा आपले कोकम ४-५, सुक्या मिरच्या ५-६ (अथवा आवडीप्रमाणे), धणे, मिरी, हळद, मीठ, फोडणीचे साहित्य
कृती
सुक्या मिरच्या, धणे, मिरी अगदी गुळगुळीत वाटून घ्या, भाज्या धुऊन, सोलून, मध्यम तुकडे करून घ्या, धणे-मिरचीचे वाटण अंदाजे पाण्यात उकळत ठेवा. त्यात कोकम घालून उकळा आणि भाज्या घाला. (वेळ वाचवायचा असेल तर काही भाज्या आधी वेगळ्या उकडून घेऊ शकता, पण या पद्धतीत तिखट छान आत मुरले जाते.)
हळद व मीठ घालून व्यवस्थित उकळी काढा. भाज्या फार शिजता कामा नयेत. पळी तापवून त्यात तेल गरम करून हिंग, मोहरी, कढीपत्ता, फोडणी करून रश्शात ओता आणि झाकण ठेवून पाचेक मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. करायला सोपा असा हा रस्सा. आठळ्यांऐवजी काजू चालतात. वटाची सोले नसतील तर आपली नेहमीची कोकमे / चिंच चालते. जसे तिखट हवे तशा मिरच्या घ्या.