Masala tak: उन्हाळ्यात दही, ताक असे पदार्थ आवर्जून घेतले जातात, ताक, लस्सी, मसालेदार मठ्ठ्याचे सेवन करावे असे नेहमीच सांगण्यात येते. दह्यापासून तयार होणारी ही पेयं शरीराला आतून थंडावा देण्याचे काम करतात. कडाक्याच्या उन्हात एक ग्लास थंड ताक प्यायला मिळाले, तर दिवसभर गारवा मिळतो. ताक केवळ उष्णतेपासून बचाव करत नाही तर आरोग्यासाठी अनेक असंख्य फायदे देखील देते. उन्हाळ्यात जेवण कमी आणि थंड प्यायची इच्छा जास्त होत असते. दिवसभर फ्रेश वाटावं म्हणून तुम्ही हे देसी ड्रिंक घ्यायला विसरू नका. सोपे आणि झटपट बनणारा हा मसाला ताक कसा बनवायचा, पहा रेसिपी.
मसाला ताक साहित्यः
- १ कप दही
- १ टेबल स्पून कोथिंबीर (बारीक चिरलेले)
- २ टी स्पून हिरवी मिरची (बारीत चिरलेली)
- १ टेबल स्पून मीठ
- २ टेबल स्पून काळे मीठ
- अर्धा कप पाणी
- चाट मसाला
मसाला ताक कृती –
मसाला ताक बनवण्यासाठी एका बाऊल मध्ये दही घ्या. त्यात मीठ आणि काळे मीठ टाकून चांगले फेटून घ्या. आता त्यात कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून मिक्स करा. आता यात पाणी टाकून ते ब्लेंडर मध्ये चांगले फिरवून घ्या. हे सर्व नीट ब्लेंड करा म्हणजे ताक चांगले तयार होईल. आता हे एका ग्लास मध्ये काढून घ्या. वरून चिमुटभर चाट मसाला आणि कोथिंबीरने गार्निश करून सर्व्ह करा. तुम्हाला थंड प्यायला आवडत असेल तर तुम्ही हे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता. किंवा एक किंवा २ बर्फाचे तुकडे सुद्धा यात टाकू शकता.
हेही वाचा – उन्हाळा स्पेशल: वाळवणीची झणझणीत सांडगी मिरची, वर्षभर घ्या आनंद
दिवसभरात तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हे देसी ड्रिंक पिऊ शकता. तसेच जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही ताकाची मदत मिळू शकते. ताक अथवा मसालेदार मठ्ठ्यात कमी कॅलरी आणि कमी फॅट्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. ताक प्यायल्याने पोट पटकन भरतं आणि वजन कमी होते.