Gulamba Recipe In Marathi: उन्हाळा आणि आंबा हे खास समीकरण लोकांच्या डोक्यात फीट झालं आहे. आंबा प्रेमी वर्षभर वाट पाहून उन्हाळ्याच्या ३ महिन्यांच्या कालावधीत आंब्यांवर यथेच्छ ताव मारत असतात. पिकलेल्या आंब्यापासून आमरस, आंबवडी यांसह अनेक पदार्थ तयार केले जातात. पिकलेल्या रसाळ आंब्यासह कच्चा आंब्याचा म्हणजेच कैरीचा वापर करुनही विविध गोष्टी बनवता येतात. यामध्ये कैरीचं पन्ह, कैरीचं लोणच यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो. कच्च्या आंबट-गोड कैरीपासून आणखी एक खास पदार्थ तयार करता येतो. या पदार्थाचे नाव आहे ‘गुळंबा’. कोकणामध्ये हा पदार्थ लोकप्रिय आहे. कैरी आणि गूळ यांच्या संयोगाने तयार झालेल्या या पदार्थाला काहीजण कैरीचं गोड लोणचं असेही म्हणतात.
साहित्य:
- ४ कैऱ्या
- २ कप गूळ
- १ दालचिनीचा तुकडा (ऐच्छिक)
- २-३ लवंगा (ऐच्छिक)
कृती:
- कैऱ्या पाण्याने व्यवस्थितपणे धुवून वाळला. त्यानंतर त्या सोलून किसून घ्या.
- किसलेल्या कैऱ्या एका कढईत टाका. त्यामध्ये गूळ टाका.
- गूळ आणि कैऱ्या दोन्ही गोष्टीचे प्रमाण समान असावे.
- त्या मिश्रणामध्ये दालचिनी, लवंग घालून ते पुन्हा नीट मिसळा.
- दालचिनी आणि लवंग यांचा वापर करावा की नाही हे तुम्ही ठरवू शकता. या गोष्टी ऐच्छिक आहेत.
- कढई गॅसवर ठेवून गॅस चालू करुन ते मिश्रण शिजवा.
- गॅस मध्यम आचेवर असताना ५ मिनिटांनंतर गूळ वितळायला लागेल, तेव्हा कढईवर झाकण ठेवा.
- पुढे ५ मिनिटे झाल्यावर झाकण काढा आणि कैऱ्या-गूळाचे मिश्रण पुन्हा मिसळा.
- त्यानंतर गॅस मंद आचेवर करुन परत ५ मिनिटांसाठी गुळंबा शिजू द्या.
- योग्य प्रकारे शिजल्यावर त्या मिश्रणाचा छान सुवास यायला सुरुवात होईल.
- हा सुगंध आल्यावर गॅस बंद करा. झाला गुळंबा तयार..
हा पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावर हवाबंद काचेच्या भांड्यामध्ये ठेवा. असे केल्याने गुळंबा किमान काही महिने तरी टिकून राहील.
(ही रेसिपी MadhurasRecipe Marathi या यूट्यूब चॅनलवरुन घेतली आहे.)