उन्हाळ्यात उष्णतेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केला जातो. चवदार असे हे पदार्थ शरीराला थंडावा देण्यासह हायड्रेट ठेवतात. याच पदार्थांमधील एक पदार्थ म्हणजे मसाला ताक. उन्हाळ्यात मसालेदार ताक प्यायल्याने शरीराचे तापमान टिकून राहते, शिवाय पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. एवढेच नाही, तर ताकाचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते, तसेच अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर असे हे मसाले ताक तुम्ही घरच्या घरी सहजपणे बनवू शकता. चला जाणून घेऊ मसाला ताक बनवण्याची सोपी रेसिपी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मसाला ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

२ कप दही
२ चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर
१ ते २ हिरव्या मिरच्या
१/४ कप चिरलेली पुदिन्याची पानं
१/४ कप हिरवी कोथिंबीर
१ चमचा काळे मीठ
चवीनुसार मीठ

मसाला ताक बनवण्याची पद्धत

मसाला ताक बनवण्यासाठी सर्वप्रथम पुदिन्याची पानं आणि हिरव्या कोथिंबीरची जाड देठ तोडून नीट साफ करा. सोललेली कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिन्याची पानं पाण्याने नीट धुवून घ्या. यानंतर एका भांड्यात हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पानं, हिरवी कोथिंबीर, जिरेपूड, काळे मीठ आणि अर्धा वाटी दही टाकून सर्व मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. दही घातल्याने मिक्सरमध्ये जास्तीचे पाणी टाकण्याची गरज भासणार नाही.

आता तयार झालेली पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढा आणि उरलेले दीड कप दही, त्यात चवीनुसार साधे मीठ आणि अडीच कप थंड पाणी घाला. यानंतर रवीच्या मदतीने दही दोन ते तीन मिनिटे चांगल्याप्रकारे घुसळून घ्या. यामुळे दह्यापासून छान फेसाळलेले ताक तयार होते. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये तयार ताक ओतून त्यात बर्फाचे तुकडे घाला आणि ताक सर्व्ह करा.