Crispy Chilli Chicken Recipe In Marathi: रविवारी प्रत्येकाकडे एकतरी नॉन व्हेज डिश तयार केली जाते. चिकन, मटण यांच्या सुवासाने रविवारी संपूर्ण घर बहरलेले असते. काही वेळेस हा जेवणाचा सुगंध घराच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत देखील पोहचत असतो. पण कधीकधी तेच ते नॉन व्हेज पदार्थ खाऊन कंटाळा येऊ शकतो. रविवारी खास बेत करण्यासाठी तुम्ही क्रिस्पी चिली चिकन हा पदार्थ घरी बनवू शकता. बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर आपण चिली चिकन खात असतो. हा पदार्थ हॉटेल स्टाईलमध्ये घरच्या घरी कसा बनवायचा हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत..
साहित्य:
• २५० ग्रॅम बोनलेस चिकन
• १ चमचा आलं-लसूण पेस्ट
• १/२ चमचा मिरपूड
• चवीनुसार मीठ
• १ १/२ चमचा लाल तिखट
• लिंबाचा रस
• १ अंड्याचा पांढरा बलक
• २-३ चमचे कॉर्न फ्लोअर
• २-३ चमचे मैदा
• तळण्यासाठी तेल
• १ चमचा तेल
• बारीक चिरलेलं आलं
• बारीक चिरलेली लसूण
• कांद्याचे मोठे चौकोनी तुकडे
• ढोबळी मिरचीचे मोठे चौकोनी तुकडे
• १ चमचा सोया सॉस
• १ चमचा चिली सॉस
• १ चमचा टोमॅटो सॉस
• १ चमचा कॉर्न फ्लोअर
• पाणी
• हिरव्या मिरच्यांचे तुकडे
• चिरलेली कांद्याची पात
कृती:
• चिकनचे छोटे तुकडे करुन त्यात आलं-लसूण पेस्ट, मिरपूड, मीठ, लाल मिरची पावडर आणि लिंबाचा रस घाला.
• तुम्ही चिकनचे चौकोनी तुकडे करू शकता. तसेच लिंबाच्या रसा ऐवजी व्हिनेगरचा वापरता येते.
• सर्व मिश्रण व्यवस्थितपणे मिसळा. पुढे त्यामध्ये अंड्याच्या पांढरा भाग- बलक (एग व्हाईट) टाका.
• त्यात कॉर्न फ्लोअर, मैदा टाकून ते मिश्रण पुन्हा एकदा नीट मिसळून घ्या.
• आता गॅसवर कढई ठेवून गॅस सुरु करा. कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चिकनचे तुकडे घाला.
• मध्यम आचेवर चिकन किमान ३-४ मिनिटांसाठी तळून घ्या. त्यानंतर ते कढईतून बाहेर काढून जास्तीचे तेल काढून टाका.
• दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम करुन त्यात लसूण टाका. ३० सेकंदांसाठी ती परतवून घ्या.
• त्यामध्ये कांदा, ढोबळी मिरची टाकून ते साधारण १ मिनिटांसाठी शिजवा.
• गॅस मंद आचेवर ठेवून कढईत सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस घालून ते मिश्रण नीट मिक्स करा.
• एका भांड्यात कॉर्न फ्लोअर आणि पाणी टाकून स्लरी तयार करा. ही स्लरी कढईतील मिश्रणात घाला.
• त्यात पुन्हा थोडस पाणी टाका. सोबतीला हिरवी मिरचीही घाला.
• तयार झालेल्या सॉसमध्ये तळलेले चिकन घालून व्यवस्थितपणे फेटा. चिली चिकन तयार होईल.
(टीप – स्प्रिंग ओनियनसह तुम्ही चिली चिकन सजवू शकता. चिकनचे तळलेले तुकडे तयार झालेल्या गरम सॉसमध्ये टाकून लगेच सर्व्ह केल्याने त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहतो. तळलेले चिकन तासभर कुरकुरीत राहते. त्यानुसार तुम्ही सॉस तयार करुन त्यात चिकन मिसळू शकता. फक्त जेव्हा चिकन सॉसमध्ये मिसळ्यानंतर ते लगेच सर्व्ह करणे गरजेचे असते.)
(ही रेसिपी MadhurasRecipe Marathi या यूट्यूब चॅनलवरुन घेतली आहे.)