Beetroot Chutney: बीटरूट खाणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण, बऱ्याच जणांना अनेकदा बीटरूट कच्चे खायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही बीटरूटची चवदार चटणी नक्कीच करून बघू शकता. पावसाळ्यात या चटणीचे सेवन केल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी, इडली, डोसा यांसहदेखील खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ बीटरूटची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…

बीटरूटची चटणी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

१. २ बीटरूट
२. १ चमचा मोहरी
३. १ चमचा चणा डाळ
४. १ चमचा उडीद डाळ
५. २ चमचे तिळाचे तेल
६. ७-८ हिरव्या मिरच्या
७. ६-७ कढीपत्त्याची पाने
८. किसलेले खोबरे
९. हिंग चिमूटभर
१०. चवीनुसार मीठ

बीटरूटची चटणी बनविण्याची कृती:

१. सर्वप्रथम बीटरूट स्वच्छ धुऊन घ्या आणि नंतर ते नीट सोलून किसून घ्या.

२. त्यानंतर एका गरम पॅनमध्ये तिळाचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा.

३. आता गरम तेलात उडीद डाळ आणि चण्याची डाळ घालून, मंद आचेवर या डाळी लालसर होईपर्यंत भाजून घ्या.

४. आता त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता व हिंग घाला.

५. त्यानंतर त्यात किसलेले बीट घाला आणि हे सर्व मिश्रण मंद आचेवर परता आणि किसलेले खोबरे घाला.

६. आता हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये घालून बारीक करा आणि त्यात चवीनुसार मीठ घाला.

हेही वाचा: घरच्या घरी या सोप्या पद्धतीने बनवा पेरुचा हलवा; लिहून घ्या साहित्य आणि कृती

७. त्यानंतर या चटणीच्या मिश्रणाला मोहरी आणि कढीपत्ता घालून फोडणी द्या.

८. बघा तयार झाली बीटरूटची चवदार चटणी. भाकरीसोबत ती सर्व्ह करा.