नीलेश लिमये nilesh@chefneel.com
साहित्य :
१ किलो चिकन पीसेस रेड करी पेस्टसाठी- २०० ग्राम मद्रास कांदे, ५० ग्राम गालांगल (आल्याप्रमाणे एक प्रकार), ५० ग्राम लसूण, १०० ग्राम लाल सुक्या मिरच्या (काश्मिरी), १०-१२ ताज्या लाल मिरच्या, २५ ग्राम लेमनग्रास, ३-४ मकरूटची पानं, १ मकरूट (लिंबाप्रमाणे दिसणारे एक प्रकारचे फळ), २ चमचे फिश सॉस, १०-१२ सोडे (सुकी कोलंबी), २ वाटय़ा नारळाचं दूध, मीठ, १ चमचा साखर, ४-५ बेसिलची पानं, ३-४ मोठे चमचे तेल.
कृती
सगळ्यात आधी आपल्याला थाई रेड करी किंवा पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी मद्रास कांदे, लेमनग्रास, सोडे, गालांगल, लाल मिरच्या, लसूण, हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. यानंतर कढईत हे वाटण परतून घ्यावे. त्यात चिकन घालून ते शिजवून घ्यावे. आता त्यामध्य मकरूट किसून घालावे. बेसिल आणि मकरूटची पाने घालावी. फिश सॉस घालून थोडे पाणी घालून ही करी शिजवून घ्यावी. यामध्ये मीठ, साखरही चवीपुरते घालावे. उकळत्या करीमध्ये नारळाचे दूध घालून आच बंद करावी. गरमागरम भाताबरोबर ही करी फस्त करावी.
ग्रीन थाई करीसाठी लाल मिरच्यांऐवजी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर वापरावी. फिश सॉसऐवजी कोणतेही सुके मासे व्हिनेगरमध्ये २-३ दिवस भिजत ठेवून द्यावे आणि मग ते व्हिनेगर फिश सॉसऐवजी वापरावे. यामध्ये २ चमचे सोया सॉसही घालता येईल. जर शाकाहारी करी करायची असेल तर चिकन, माशांऐवजी भाज्या वापरता येतील.