सुटीच्या दिवशी विशेष काही पदार्थ बनवायचा असेल, तर खासकरून आपण बटाट्याचे किंवा कोणत्याही प्रकारचे पराठे बनवणे पसंत करतो. कारण- एक तर ते बनवायला सोपे असतात आणि त्यांची चवही मस्त असते; शिवाय हे पराठे भाज्यांचा वापर करून बनवल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असतात. परंतु, नेहमी बनवणाऱ्या बटाटा, कोबी किंवा पालक पराठ्यांऐवजी तुम्ही हा भन्नाट आणि जरा वेगळा असा ‘पिझ्झा पराठा’ बनवून पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऐकायला कठीण वाटत असला तरीही करायला तो तितकाच सोपा आहे. या पराठ्यात पिझ्झावर घातले जाणारे पदार्थ घालून, मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करता येतो. एकदम आगळ्यावेगळ्या फ्युजन पिझ्झा पराठ्याची ही रेसिपी @its_shreyajoshi या हँडलने इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून शेअर केली आहे. झटपट तयार होणाऱ्या या पराठ्याची किंवा पिझ्झाची रेसिपी काय आहे ते आपण पाहू.

पिझ्झा पराठा

साहित्य

गव्हाचे पीठ
कांदा
टोमॅटो
सिमला मिरची
मक्याचे दाणे
मीठ
मिरपूड
चिली फ्लेक्स
ओरिगॅनो
पिझ्झा पास्ता सॉस
मेयोनीज किंवा कोणतेही उपलब्ध असणारे चीज

हेही वाचा : Recipe : बटाट्यापासून बनवा स्वादिष्ट नाश्ता; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल पाहा…

कृती

एका मोठ्या बाउलमध्ये कांदा, टोमॅटो, सिमला मिरची (सर्व बारीक चिरलेले), उकडलेले मक्याचे दाणे घालून घेऊन, त्यामध्ये मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स, ओरिगॅनो हे सर्व घालून सगळे पदार्थ नीट मिसळून घ्या. आता त्या मिश्रणात मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस घालून घेऊन, पुन्हा एकदा सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.

दुसऱ्या एक बाउलमध्ये गव्हाचे पीठ नेहमीप्रमाणे मळून घ्या. आता कणकेचा एक गोळा घेऊन, त्याची मोठी पोळी लाटून घ्या. पोळी थोडी जाड ठेवावी.

आता या लाटलेल्या पोळीत तयार भाज्यांचे मिश्रण एका कोपऱ्यात घालून घेऊन, त्यावर चीज किसून घेऊन पोळीचा उरलेला भाग, भाजी ठेवलेल्या भागावर ठेवून पोळी बंद करून घ्या. आता याला कारंजीसारखा आकार येईल. पोळीच्या कोपऱ्यावर काट्या-चमच्याने थोडी नक्षी करून घ्या.

एका तव्यावर बटर किंवा तेल टाकून पराठ्याच्या दोन्ही बाजू व्यवस्थित भाजून घ्या. तव्यावर भाजल्याने, पराठ्याच्या आत टाकलेले चीज वितळून गेले असेल. त्यामुळे हा पराठा बाहेर मिळणाऱ्या एखाद्या पिझ्झासारखा दिसतो.

आता तुम्ही तयार पराठा ताटलीत काढून घेऊन, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Try fusion recipe at home make this amazing tasty and cheese pizza paratha for everyone dha