आषाढी एकादशी अवघ्या जवळ आली आहे. कित्येक जण या दिवशी उपवास करतात. एकादशीचा उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी, साबुदाना वडे हा बेत कित्येकांच्या घरी ठरलेलाच असतो. पण काही लोकांना साबुदाना खाऊन कंटाळा आला आहे तर काही लोकांना साबुदाण्याला काहीतरी हेल्दी पर्याय हवा आहे. अशा वेळी तुम्ही राजगिरा पीठाचे थालीपीठ करू शकता. हे रेसिपी अगदी सोपी आणि चवीला अप्रतिम आहे. साबुदाना पचायला जड असतो त्यापेक्षा राजगीरा मात्र तुलनेने खूप हलका असतो त्यामुळे कित्येक लोक राजगिऱ्याचे लाडू खातात. आता यावेळी तुम्ही राजगीरा पिठाचे थालीपीठही करून पाहा. रेसिपी माहित नसेल तर काळजी करू नका आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. चला तर मग जाणू घेऊ या..
राजगिरा पिठाचे थालिपीठ खा
साहित्य – राजगिरा पीठ २ मोठे चमचे, रताळे अर्धे, भाजके दाणे/दाण्याचा कूट १ चमचा, चवीसाठी तिखट, मीठ, जिरेपूड, गूळ (स्वादानुसार), कोथिंबीर चिरलेली १ चमचा, तूप दोन चमचे
हेही वाचा – घरीच तयार करा हेल्दी आणि टेस्टी मशरूम लॉलिपॉप्स! लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी
कृती – एका भांड्यात राजगिरा पीठ घ्या. त्यात रताळे किसून घाला. वरील मिश्रणात दाण्याचे कूट, जिरे पूड, तिखट, मीठ, गुळाचा खडा कोथिंबीर घालून मिश्रणात अंदाजे पाणी घाला. जेणेकरून थालीपिठाचे मिश्रण सैलसर भिजले जाईल. मिश्रण हे चांगले मळून घ्या. तवा तापवा, त्यावर तूप सोडा आणि थालीपीठ दोनू बाजूंनी खमंग भाजून घ्या.