महाराष्ट्राच्या उत्तरेकडे दख्खनच्या पठारावर नि तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला भूप्रदेश म्हणजे खान्देश. ‘देश तसा वेश’ असे आपण म्हणतो. तोच न्याय खाद्यसंस्कृतीलाही लागू होतो. ठसकेबाज अहिराणी भाषा, श्रमिक दिनचर्या आणि त्यालाच अनुरूप असे झणझणीत आणि झटकेदार खान्देशी जेवण. मसालेदार तिखट भाज्या, घट्ट वरण, लोणची, पापड, भजे, बोन्डे यांचे अनेक प्रकार येथे चाखायला मिळतात. चला तर मग आज बनवुया खानदेशी वांग्याची घोटलेली भाजी…
झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी साहित्य
२५० ग्राम वांगी
२ टेबलस्पून तेल
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून मोहरी
बारीक चिरलेली कोथिंबीर
३ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
चवीनुसार मीठ
मसाला बनवण्यासाठी
१ इंच आलं
६-७ लसूण पाकळ्या
१ इंच दालचीनी
५-६ काळीमिरी
३ लवंगा
झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी कृती
१. वांगी स्वच्छ धुवून चिरून पाण्यामध्ये घालून ठेवा, एका कुकर मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे घालून खमंग फोडणी करून घ्या
२. खलबत्त्यात मध्ये आलं, लसूण दालचीनी, लवंग,आणि काळीमिरी कुटून हा तयार फ्रेश मसाला तेलात घालून परतून घ्या, त्या नंतर हिरव्या मिरच्या घालून घ्या
३. आता त्यात हळद, लाल तिखट, आणि चिरलेली वांगी घालून परतून घ्या
४. चवीनुसार मीठ, घालून १ कप पाणी घालून घ्या, आणि कुकरला ३ शिट्या काढून घ्या
५. कुकर थंड झाला की भाजी गरम असताना मॅशर किंवा चमच्याने घोटून घ्या आणि वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीने करा घोसाळ्यांचे भरीत; भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
६. अशाप्रकारे खायला तयार आहे,एकदम सोप्पी अशी..! “झणझणीत खान्देशी वांग्याची घोटलेली भाजी”वरण-बट्टी किंवा कळण्याच्या,ज्वारीच्या किंवा मग तांदळाच्या भाकरी सोबत ही भाजी मस्त लागते..