Manchurian Paratha Recipe : पराठा व दही हे नाव जरी ऐकलं तरी तोंडाला आपसूकच पाणी सुटते. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे जेवणासाठी बनवतो. यामध्ये पालक पराठा, बटाटा पराठा, बीट पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा आदी विविध प्रकारचे पराठे बनवले जातात. कधी एखादी भाजी उरली तरी आई पोळी लाटताना त्या पिठाच्या गोळ्यात ती भाजी भरून चविष्ट, पौष्टीक असा पराठा बनवून नाश्त्याला बनवते. पण, जर तुम्हाला एखादा नवीन पद्धतीचा पराठा बनवून पाहायचा असेल. तर तुम्ही मंच्युरियन पराठा बनवून पाहू शकता. चला तर पाहू या पदार्थाची साहित्य व कृती…
साहित्य :
१. कोबी – १ + १/४ कप
२. गाजर – एक
३. सिमला मिरची – एक
४. कांदा – एक
५. आलं-लसूण पेस्ट – एक चमचा
६. हिरव्या मिरच्या – एक ते तीन
७. कोथिंबीर
८. काळी मिरी पूड १/२ चमचा
९. टोमॅटो केचअप – १ चमचा
१०. तांदळाचे पीठ – पाच ते सहा चमचे
११. गव्हाचे पीठ – तीन ते चार चमचे
१२. मीठ
व्हिडीओ नक्की बघा…
कृती :
१. एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, सिमला मिरची, कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, काळी मिरी पूड, टोमॅटो केचअप, तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, मीठ घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
२. तयार मिश्रणाचे पीठ मळून घ्या.
३. त्यानंतर पोळी बनवताना ज्याप्रमाणे आपण गोळ्याला थोडं पीठ लावून घेतो तसं लावा आणि पराठा लाटून घ्या.
४. त्यानंतर तेल किंवा तूप लावून पराठा मस्त भाजून घ्या.
५. अशाप्रकारे तुमचा भाज्यांचा पौष्टिक पराठा तयार.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @vaishalisrecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. वैशाली असे या युजरचे नाव आहे. युजर नेहमी नवनवीन पदार्थ बनवत असते. भाज्यांपासून जसं व्हेज मंच्युरियन बनवलं जाते अगदी त्याचप्रमाणे हा पराठा बनवला आहे. त्यामुळे युजरने या पदार्थाचे नाव मंच्युरियन पराठा असा ठेवलं आहे. तसेच तुम्ही हा पदार्थ सकाळी नाश्ता किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता. कारण – पराठा हा लहान मुलांच्या अगदी आवडीचा असतो. त्यातचं मंच्युरियन पराठा हे नाव घेताच त्याचा आनंद गगनात मावणार नाही व नक्कीच ते हा पदार्थ आवडीने खातील.