Chana Dal Papad Recipe in Marathi: उन्हाळा सुरू होताच महिलावर्ग वाळवणाला लागतात. कुरडई, पापड यांसह इतर प्रकार आवर्जून केले जातात. बऱ्याच गृहिणी हे पदार्थ घरी बनवून विकण्याचा घरगुती व्यवसाय करीत असतात. उन्हाळ्यात घरोघरी पापड- लोणची, मसाले शेवया बनवण्यासही सुरुवात होते. वर्षभरासाठी पुरतील असे साठवणीचे पदार्थ बनवले जातात आणि मग पावसाळ्यात, थंडीत अगदी साध्या जेवणाची चव वाढवण्यासाठी यांचा चांगलाच फायदा होतो. पापड हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो. जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून पापड आवडीने खाल्ला जातो. तर आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चणा डाळीच्या पापडाची रेसिपी सांगणार आहोत. या पापडासाठी तुम्हाला जास्त मेहनत आणि कष्ट घ्यावे लागणार नाहीत. चला तर जाणून घेऊ चणा डाळीच्या पिठाचे पापड बनविण्याची सोपी रेसिपी…
कृती :
अर्धा किलो चणा डाळीचे पीठ घ्यायचं. त्यानंतर थोड्या प्रमाणात पापड मसाला घेऊन, थोड्या कडक उकळलेल्या गरम पाण्यात १५ मिनिटांसाठी टाकावा. पाण्यात मसाला पूर्ण मिक्स करून घ्यावा. त्यानंतर चणा डाळीच्या पिठामध्ये थोडी मिरची पावडर टाका. १५ मिनिटांनी गरम पाणी थोडे थंड झाल्यावर ते चणा डाळीच्या पिठामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि थोडं थोडे पाणी टाकून, पीठ मळायला सुरुवात करा. तुम्हाला पीठ घट्ट मळून घ्यावं लागेल. पीठ मळून झाल्यावर त्यावर थोडं गोडं तेल लावून घ्या… जास्त प्रमाणात तेल लावू नये… पीठ मळून झाल्यावर हे पीठ रात्रभर पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचं. त्यावरून पुन्हा तेलाचा हात लावायचा. तुम्ही झटपटही करू शकता. त्यासाठी पीठ मळून झाल्यावर तुम्हाला दोन ते तीन तास ठेवावं लागेल. त्यानंतर पापड करण्यास सुरुवात करा.
बंद डब्यातून पीठ काढून, त्याला थोडंफार कुटून घ्यायचं. तुम्ही खलबत्त्यातही कुटून घेऊ शकता. कुटल्यानंतर पिठाला थोडं तेल लावायचं. त्यानंतर तुमच्या पद्धतीनं कमी-जास्त आकारात पिठाच्या गोळ्या करायच्या. लहान-मोठ्या केल्या तरी चालेल. हातावर तेलाचं बोट घेऊन तुम्ही पापड पातळ लाटण्यास सुरुवात करा. अशा पद्धतीनं तुम्ही सर्व पापड तयार करू शकता. यात तुम्ही दोन चमचे उडदाच्या डाळीचं पीठही घालू शकतात. अर्धा किलो पापडाच्या पिठामध्ये तुम्ही ३० ते ३२ पापड करू शकता. दोन ते तीन दिवस हे पापड उन्हात वाळू द्यायचे. पापड व्यवस्थित सुकल्यानंतर कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून, पापड तळून घ्या. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चणा डाळीचे पापड.