Dal Khichdi Tadka Recipe In Marathi: अलीकडे फास्टफूडचा बोलबाला असला तरी अनेकदा छान काहीतरी घरगुती पण तरीही हॉटेलच्या चवीचे खावेसे वाटते. विशेषतः दिवसभर थकल्यावर दातांना सुद्धा उगाच कुरकुरीत किंवा जाड पावाचे पदार्थ खावेसे वाटत नाहीत. अशावेळी कोणी मस्त गरम डाळ खिचडीचे ताट हातात दिले तर जो आनंद होतो तो काही निराळाच. आता खिचडी म्हंटल की काही जण नाकं मुरडतात, मी काय आजारी आहे का असाही प्रश्न करतात पण आज आपण हॉटेल स्टाईल डाळ खिचडीची तडका मारलेली अशी रेसिपी पाहणार आहोत की तुम्हाला प्रश्न करायला जागाच उरणार नाही.
आजवर कदाचित तुम्ही ही रेसिपी अशीच घरी करून पहिली असेल पण हॉटेलमध्ये मिळते तशी चव आणि त्यापेक्षाही एकदम अचूक पातळ व घट्टपणा काही येत नाही, हो ना? आज या समस्येवर सुद्धा एक सोपी ट्रिक आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया अगदी घरच्या घरी हॉटेल स्टाईल दाल खिचडी तडका कसा बनवायचा…
दाल खिचडी तडका साहित्य (Dal Khichdi Tadka Ingridients)
अर्धा कप बासमती तुकडा तांदूळ, अर्धा कप मूग डाळ, कांदे, टोमॅटो, गरम मसाला, धणे जिरे पूड, लाल तिखट, कडीपत्ता, लाल सुकी मिरची, बारीक चिरलेले लसूण व उभे चिरलेले आले, मोहरी, जिरे,हळद ,हिंग, हिरवी मिरची, कोथिंबीर, तेल/ तूप, पाणी
दाल खिचडी तडका कृती (Dal Khichdi Recipe In Marathi)
१) कुकरच्या भांड्यात २ चमचे तेल आणि १ चमचे तूप घेऊन गरम होऊ द्या. यात १ टीस्पून जिरे घालून तडतडू द्या. २ लाल मिरच्या घाला. ५-६ चिरलेल्या लसूण पाकळ्या घालून एक मिनिट परतून घ्या. २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला.
२) २ बारीक किंवा उभे चिरलेले कांदे घाला आणि ते ब्राऊन होईपर्यंत तळा, १ टीस्पून आले लसूण पेस्ट, १ टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून धणे पावडर, १/२ टीस्पून जिरे पावडर, १/२ टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घाला. यामध्ये १/४ कप पाणी घालून २-३ मिनिटे शिजवा.
३) १ कप (मसूर, मूग आणि तुरीची डाळ एकत्र घेऊ शकता किंवा नुसती मूग डाळ घेतली तरी चालते, या डाळी एकत्र १५ मिनिट भिजवून ठेवा) व १ कप भिजवलेले तांदूळ घ्या. डाळ तांदूळ शिजलेल्या मसाल्यात घालून थोडी ताजी कोथिंबीर घाला. हे सर्व पदार्थ नीट मिसळून शेवटी २.५ कप पाणी घाला
४) कुकरचे झाकण लावा आणि ३ शिट्ट्या पर्यंत शिजू द्या. शिजल्यावर अगदी लगेच कुकर उघडू नका. जर खिचडी अगदीच घट्ट झाली असेल तरच त्यात अर्धा कप गरम पाणी घाला व मंद आचेवर ३-४ मिनिटे शिजू द्या. सर्व्ह करताना वरून 1 टीस्पून तूप आणि कोथिंबीर घालून गरम गरम खायला घ्या.
हे ही वाचा<< Video: भाताचा लगदाही नको,कच्चाही नको! मोकळा फडफडीत भात बनवायच्या ‘या’ १० बेस्ट टिप्स पाहा
तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व कशी होते ते आम्हाला नक्की कळवा.